शेकडो भारतीय मायदेशी परतण्यास प्रारंभ
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
इराणने भारतासाठी आपले हवाई क्षेत्र उघडले आहे. हे हवाई क्षेत्र सहसा बंद असते. भारत सरकार ‘ऑपरेशन सिंधू’ अंतर्गत इराणमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढत आहे. पुढील दोन दिवसात सुमारे 1,000 भारतीय विद्यार्थी दिल्लीला पोहोचण्याची अपेक्षा आहे. हे विद्यार्थी इराणमधील संघर्ष सुरू असलेल्या शहरांमध्ये अडकले होते. पहिले विमान शुक्रवारी रात्री दिल्लीत दाखल झाले असून शनिवारी सकाळी आणखी दोन विमाने पोहोचणार आहेत.
भारतीय विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी इराणने हे पाऊल उचलले आहे. इराणचे हवाई क्षेत्र बहुतेक आंतरराष्ट्रीय उ•ाणांसाठी बंद आहे. इस्रायल आणि इराणी सैन्यामध्ये क्षेपणास्त्र हल्ले आणि ड्रोन हल्ले होत आहेत. या संघर्षात भारतीय विद्यार्थी आणि अन्य लोकांना बाहेर काढण्यासाठी एक विशेष मार्ग देण्यात आला आहे.
केंद्र सरकार भारतीयांना लवकरात लवकर मायदेशी परत आणण्याचा प्रयत्न करत आहे. ‘ऑपरेशन सिंधू’ हा एक आपत्कालीन निर्वासन कार्यक्रम आहे. त्याचा उद्देश इराणमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे परत आणणे आहे. इराणने भारताला विशेष परवानगी दिल्यामुळे भारताला आपल्या नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढता येईल. इराणने भारताला मदत करण्याची तयारी दर्शवत मोठा दिलासा दिला आहे.
इस्रायल-इराण युद्धादरम्यान इराणमधून भारतीय नागरिकांना बाहेर काढल्यानंतर, भारत सरकारने इस्रायलमधूनही नागरिकांना बाहेर काढण्यासाठी ‘ऑपरेशन सिंधू’बाबत एक नियमावली जारी केली आहे. ‘ऑपरेशन सिंधू’बाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, इस्रायल आणि इराणमधील सध्याची परिस्थिती लक्षात घेता, भारत सरकारने इस्रायलमधून बाहेर पडू इच्छिणाऱ्या भारतीय नागरिकांना बाहेर काढण्याचा निर्णय घेतला आहे. इस्रायलहून भारतात त्यांचा प्रवास प्रथम रस्ता वाहतुकीने होईल आणि त्यानंतर त्यांना हवाई मार्गाने भारतात पोहोचवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
‘ऑपरेशन सिंधू’च्या पार्श्वभूमीवर तेल अवीवमधील भारतीय दूतावास भारतीयांच्या बाहेर काढण्याची व्यवस्था करेल. मंत्रालयाने सर्व भारतीय नागरिकांना तेल अवीवमधील भारतीय दूतावासात नोंदणी करण्याची विनंती केली आहे. तसेच, कोणत्याही शंका असल्यास, मंत्रालयाने तेल अवीवमधील भारतीय दूतावासात स्थापन केलेल्या 24/7 नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचा सल्ला दिला आहे.









