ओटावा :
कॅनडाच्या युनिव्हर्सिटी ऑफ कॅलगरीत शिक्षण घेत असलेली भारतीय विद्यार्थिनी तान्या त्यागी हिचा संशयास्पद स्थितीत मृत्यू झाला आहे. यासंबंधीची माहिती व्हँकुव्हर येथील भारतीय वाणिज्य दूतावासाने दिली आहे. तान्या ही दिल्लीतील रहिवासी होती आणि उच्चशिक्षणासाठी कॅनडा येथे गेली होती. याप्रकरणी स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात असून पीडित परिवाराला शक्य ती सर्व मदत केली जाणार असल्याचे भारतीय दूतावासाने एक्सवर पोस्ट करत सांगितले आहे. तर तान्याच्या परिवाराने तिचा मृतदेह भारतात आणण्यासाठी मदत करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींना केले आहे. अलिकडच्या काळात अनेक भारतीय विद्यार्थ्यांना विदेशात संकटाला सामोरे जावे लागले आहे. चालू वर्षाच्या प्रारंभी 20 वर्षीय भारतीय विद्याथिंनी सुदिक्षा कोनांकी ही डॉमिनिकन रिपब्लिक येथे बेपत्ता झाली होती. सुदिक्षा ही अमेरिकेची स्थायी रहिवासी होती आणि युनिव्हर्सिटी ऑफ पिट्सबर्गमध्ये शिकत होती.
6 मार्च रोजी ला अल्ताग्रासिया प्रांताच्या रिउ पंटा काना हॉटेलनजीक समुद्र किनाऱ्यावर ती अखेरची दिसून आली होती. तिच्याबद्दल अद्याप कुठलीच माहिती समोर आलेली नाही.









