कोल्हापूर / अवधुत शिंदे :
सध्या पावसाळ्याच्या आगमनामुळे निसर्गाने आपले सौंदर्य उधळले आहे. धबधबे, झरे, हिरवीगार डोंगररांगा आणि वनराई यामुळे तरुणांमध्ये ट्रेकिंगसाठी एक वेगळाच उत्साह आणि आकर्षण निर्माण झाले आहे. शहरातील धकाधकीच्या जीवनातून बाहेर पडून निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवणे, थोडेसे साहस अनुभवणे यात काहीच वावगे नाही. मात्र अलीकडील काळात या साहसाचा अतिरेक होत चालला आहे आणि हा अतिरेक अनेक वेळा जीवावर बेततो आहे.
पावसाळा सुरू झाला की तरुणांचा ओढा डोंगर, किल्ले, धबधबे आणि जंगलांमध्ये वाढतो. समाजमाध्यमांवर ‘ट्रेंडिंग‘ होण्याच्या नादात अनेक जण जीवघेण्या गोष्टी करताना दिसतात. उंचावरून सेल्फी घेणे, धबध्याच्या कडेला उभे राहून व्हिडिओ बनवणे, चिखलातून स्लाईड होणे, प्रवाहात उडी घेणे, अशा प्रकारच्या कृती केवळ मनोरंजनासाठी नाहीत, तर अपघाताला निमंत्रण देणाऱ्या ठरतात.
- हिडन स्पॉट्सची क्रेझ माहिती शिवाय धाडस
अलीकडच्या काळात ‘हिडन स्पॉट्स‘ म्हणजेच फारशा परिचित नसलेली, पर्यटन विकासातून दूर असलेली ठिकाणे शोधण्याची क्रेझ वाढली आहे. यामागे मुख्यत सोशल मीडियावरील रील्स, व्लॉग्स आणि फोटोशूट्सचा प्रभाव आहे. काही जण या ठिकाणांबद्दल योग्य माहिती मिळवतात, योग्य मार्गदर्शक घेतात आणि काळजीपूर्वक ट्रेकिंग करतात. पण दुर्दैवाने, बहुतांश तरुण ही ठिकाणं शोधताना कोणतीही भौगोलिक माहिती, हवामान अंदाज, स्थानिक मार्गदर्शन यांचा विचार करत नाहीत.
या ‘हिडन स्पॉट्स‘मध्ये जाताना ना सुरक्षा साधने असतात, ना आवश्यक तयारी. परिणामी, अचानक येणारे पुराचे पाणी, खडकावरून घसरणे, जंगलात वाट चुकणे किंवा जखमी होणे अशा घटना घडतात.
- जून महिन्यातील घटनांचा धडाच पुरेसा
दरवर्षी जून-जुलै महिन्यात अशा घटना वारंवार घडतात. कुठे धबध्यात फोटो काढताना पाय घसरून मृत्यू, कुठे पाण्याच्या प्रवाहात वाहून जाणे, तर कुठे ट्रेकिंगदरम्यान हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू अशा अनेक घटना वृत्तपत्रांतून वाचायला मिळतात. पण तरीही ही जोखीम पत्करण्याची तरुणांची तयारी कमी होत नाही.
- सोशल मीडियाचा वाढता प्रभाव स्टंटबाजीची स्पर्धा
आजची तरुणाई सोशल मीडियावर सक्रिय आहे. इंस्टाग्राम, फेसबुक, स्नॅपचॅटवर फोटो आणि व्हिडिओ टाकून ‘लाईक्स‘ आणि ‘फॉलोअर्स‘ मिळवण्याची स्पर्धा सुरू आहे. त्यातूनच उंच कड्यावरून उड्या मारणे, धबध्याच्या अगदी काठावर जाऊन व्हिडिओ शूट करणे, वाहनांवर स्टंट्स करणे अशा कृती जन्म घेतात. या कृती केवळ स्वत:च्या जीवाला धोका निर्माण करतात असे नाही, तर इतरांच्याही जिवावर बेतू शकतात.
अनेकदा मित्रमंडळींच्या गटात एकमेकांना ‘डेरिंग‘ करून दाखवण्याच्या प्रयत्नांत या स्टंट्सची तीव्रता वाढते. यातून अनेकांना आपला जीव गमवावा लागतो. दुर्दैव म्हणजे या गोष्टींची ‘शो ऑफ‘ म्हणून प्रसिद्धी होते, आणि इतर तरुण त्याचाच अनुकरण करतात.
- पालकांची आणि समाजाची जबाबदारी
या परिस्थितीमध्ये पालकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. आपल्या मुलांना निसर्गप्रेम, साहसी उपक्रम, फिरणं यासाठी प्रोत्साहित करणं हे चांगलं आहे. पण त्याचबरोबर योग्य प्रशिक्षण, भौगोलिक ज्ञान, सुरक्षितता याची जाणीव करून देणं तितकंच आवश्यक आहे
शाळा, महाविद्यालये, ट्रेकिंग क्लब्स यांनीही तरुणांना योग्य प्रशिक्षण द्यावे. ट्रेकिंगचे नियम, निसर्गातील सुरक्षिततेचे महत्त्व, हवामानाचा अंदाज वाचणे, प्राथमिक उपचारांचे ज्ञान हे सर्व तरुणांना शिकवले गेले पाहिजे.
- प्रशासनाची भूमिका
प्रशासनानेही काही धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आहे. काही धोकादायक स्पॉट्सना प्रतिबंध लावणे, चेतावणी फलक लावणे, स्थानिक पोलीस व वनविभाग यांच्या साहाय्याने गस्त ठेवणे हे उपाय आवश्यक आहेत. शिवाय, सोशल मीडियावर अशा स्टंट्सचे व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवर काहीसे निर्बंध असणेही आवश्यक ठरेल.
सध्या तरुणामध्ये पर्यटन स्थळी जावून रिल्स बनवण्याची नवीन फॅशन रुजत आहे. यामुळे पर्यटनासोबत धोकेही वाढत आहेत. रिल्स पाहून त्या ठिकाणी कसे जायाचे याचा शोध घेतात. मात्र त्या ठिकाणी किती धोका आहे, सुरक्षिततेच्या काय उपाययोजना आहेत. याची माहिती घेतली जात नाही. यामुळे धोका वाढत आहे.
सम्राट केरकर अध्यक्ष, बायसन नेचर क्लब








