बेंगळूरमध्ये आज नगरविकास खात्याच्या कार्यदर्शींसोबत बेळगाव मनपा अधिकाऱ्यांची बैठक
बेळगाव : महापालिकेच्यावतीने तुरमुरी येथील घनकचरा प्रकल्पात विविध कामे हाती घेण्यात आली आहेत. शुक्रवार दि. 20 रोजी नगरविकास खात्याच्या कार्यदर्शी दीपा चोळण यांच्यासोबत बेळगाव मनपा अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे सदर बैठकीत कचरा डेपोत सुरू असलेल्या कामांसंदर्भात माहिती देण्यासाठी गुरुवारी मनपा आयुक्त शुभा बी., पर्यावरण अभियंता हनुमंत कलादगी व महापालिकेच्या अभियंत्यांनी भेट देऊन पाहणी केली.
शहरातील कचऱ्याची उचल केल्यानंतर त्याच्यावर तुरमुरी येथील घनकचरा प्रकल्पात प्रक्रिया केली जाते. प्लास्टिक कचऱ्यावर प्रक्रिया केल्यानंतर तो कचरा रस्ते बांधण्यासाठी डाल्मिया आणि जेके सिमेंटला दिला जातो. घनकचरा व्यवस्थापनासाठी अलीकडेच स्मार्ट सिटी-2 योजनेतून बेळगाव महानगरपालिकेला विशेष अनुदान मंजूर झाले आहे. त्यामुळे या अनुदानातून कचरा डेपोत शेड उभारण्यासह रस्ते केले जात आहेत. त्याचबरोबर इतर प्रकारची कामेदेखील हाती घेतली आहेत.
शुक्रवारी बेंगळूर येथे नगरविकास खात्याच्या मुख्य सचिव दीपा चोळण यांच्यासोबत बेळगाव मनपा अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्याठिकाणी बेळगाव मनपाच्या कामांची माहिती घेतली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी मनपा आयुक्तांसह इतर अधिकाऱ्यांनी तुरमुरी कचरा डेपोला प्रत्यक्ष भेट देऊन त्याठिकाणी सुरू असलेल्या कामांची पाहणी करून माहिती घेतली.









