खेड :
गुरुवारी पहाटेपासूनच थैमान घालणाऱ्या पावसामुळे दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास जगबुडीच्या पुराचे पाणी गांधीचौकात घुसताच हाहाकार उडाला. नदीपात्रातील गाळ उपसूनही पुराचे पाणी बाजारपेठेत शिरल्याने व्यापाऱ्यांच्या पोटात भीतीचा गोळा उठला. तीनबत्तीनाका परिसरही जलमय झाला. पुरामुळे व्यापाऱ्यांची मोठी हानी झाली. नदीकाठच्या घरांनाही पुराचा फटका बसला. नगर परिषदेजवळील छत्रपती संभाजीराजे भाजी मंडईतही पाणी घुसल्याने भाजीविक्रेत्यांची धांदल उडाली. नारिंगी नदीचे पाणी सुर्वे इंजिनिअरींगनजीक घुसल्याने खेड-दापोली मार्ग वाहतुकीसाठी ठप्प झाला. दरम्यान पावसामुळे मंडणगड-दापोली राज्य मार्गावरील केळवत घाटात मोठे झाड कोसळल्याने व आंबडवे-राजेवाडी राष्ट्रीय मार्गावरील तुळशी घाटात दरड रस्त्यावर आल्याने वाहतूक विस्कळीत झाली.
बुधवारी रात्रीपासूनच धो-धो कोसळणाऱ्या पावसामुळे जगबुडी व नारिंगी नद्या गुरुवारी पहाटेच्या सुमारास ‘ओव्हर फ्लो’ झाल्या. सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास जगबुडीने धोक्याची पातळी ओलांडताच व्यापाऱ्यांसह नदीकाठच्या रहिवाशांच्या उरात धडकी भरली. पावसाचा जोर कायम राहिल्याने नगर प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देत नदीकाठच्या रहिवाशांना सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्याचे निर्देश दिले. जगबुडी नदीपात्रातून 13,549 ब्रास म्हणजेच 35 हजार 544 घनमीटर गाळ उपसा करण्यात आला आहे. यामुळे पुराची टांगती तलवार दूर होईल, या व्यापाऱ्यांच्या आशेवर पुराने पाणी फेरले. सायंकाळच्या सुमारास मटण-मच्छीमार्केटसह नजीकची दुकाने, वाल्कीगल्ली, गांधीचौक येथे पाणी घुसले. व्यापाऱ्यांनी दुकानातील साहित्य सुरक्षितस्थळी हलवण्यास सुरुवात केली. छत्रपती संभाजीराजे भाजी मंडईतही घुसलेल्या पुराच्या पाण्यामुळे विक्रेत्यांचे नुकसान झाले. नारिंगी नदीही जलमय होवून खेड-दापोली मार्गावरील सुर्वे इंजिनिअरींगनजीक पाणी घुसताच मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला. दापोली, मंडणगडसह खाडीपट्ट्याच्या दिशेने जाणारी वाहतूक शिवतररोड-कुंभारवाडा मार्गे वळवण्यात आली. मुसळधार पावसामुळे वीजपुरवठाही सतत खंडित होत राहिल्याने व्यापाऱ्यांना फटका बसला. बाजारपेठेत पुराचे पाणी घुसताच शाळा, महाविद्यालयांनाही दुपारच्या सुमारास सुट्टी जाहीर करण्यात आली. सायंकाळी उशिरापर्यंत पावसाचा जोर कायम होता.
- कोकण रेल्वेगाड्यांच्या सेवांवर परिणाम
मुसळधार पर्जन्यवृष्टीचा कोकण मार्गावरून धावणाऱ्या रेल्वेगाड्यांच्या सेवांवरही गुरुवारी परिणाम झाला. नागपूर-मडगाव स्पेशल तब्बल 5 तास उशिराने मार्गस्थ झाल्याने प्रवासी रखडले. अन्य 7 रेल्वेगाड्यांचे प्रवासी खोळंबले. उधना-मंगळूर स्पेशलसह दिवा-सावंतवाडी एक्स्प्रेस 2 तास उशिराने धावली. केरला संपर्कक्रांती एक्स्प्रेस 1 तास 15 मिनिटे, तर एर्नाकुलम-एलटीटी दुरांतो एक्स्प्रेस 1 तास 50 मिनिटे विलंबाने मार्गस्थ झाली. निजामुद्दीन-एर्नाकुलम मंगला एक्स्प्रेस 1 तास 30 मिनिटे तर एलटीटी-तिरुवअनंतपूरम नेत्रावती एक्स्प्रेस 1 तास विलंबाने धावली. करमाळी-एलटीटी वातानुकूलित स्पेशललाही 1 तासांचा ‘लेटमार्क’ मिळाला. वाडीमालदेत दरड कोसळून वाहतूक खोळंबली








