इराणची रुग्णालयावर क्षेपणास्त्रे, संघर्षाचा भडका
वृत्तसंस्था/तेल अवीव, तेहरान
इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष आता अधिकच भडकला आहे. दोन्ही देशांनी एकमेकांवर क्षेपणास्त्रांचा भडिमार चालविला आहे. इराणने इस्रायलच्या एका रुग्णालयावर क्षेपणास्त्रे डागल्यानंतर इस्रायलने या हल्ल्याचा प्रतिशोध घेताना इराणच्या महत्वाच्या अणुभट्टी जोरदार बाँबफेक करुन तिची मोठी हानी केली आहे. या अणुभट्टीतून किरणोत्सर्ग होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गुरुवार हा या संघर्षाचा सलग आठवा दिवस होता. गुरुवारी सकाळपासूनच इराणने इस्रायलच्या काही आस्थापनांवर क्षेपणास्त्रे डागली. अनेक क्षेपणास्त्रे इस्रायलच्या सुरक्षा व्यवस्थेने आकाशातच नष्ट केली. तथापि, दोन क्षेपणास्त्रे दक्षिण इस्रायलमधील रुग्णालयावर आदळली. या हल्ल्यात चार जणांचा मृत्यू झाला आहे. इराणने केलेल्या हल्ल्यांमध्ये दिवसभरात इस्रायलच्या 25 नागरीकांचा मृत्यू झाला.
इस्रायलचा प्रतिशोध
इराणने इस्रायलमधील नागरी वस्त्या आणि रुग्णालये यांना लक्ष्य केल्याने संतप्त झालेले त्या देशाचे नेते बेंजामिन नेत्यान्याहू यांनी, इराणला या हल्ल्याची जबर किंमत मोजावी लागेल, अशी घोषणा केली. त्यानंतर एक तासातच इराणनच्या अराक अणुभट्टीवर इस्रायलच्या विमानांनी बाँबफेक केली. या हल्ल्यात या अणुभट्टीची मोठी हानी झाल्याचे वृत्त आहे. या भट्टीतून किरणोत्सर्ग होत असल्याची शक्यता आहे. या अणुभट्टीच्या परिसरात आणखी दोन अणुप्रकल्प असून त्यांनाही लक्ष्य करण्यात आले होते. गेल्या आठ दिवसांमधील हा इस्रायलचा इराणच्या अणुस्थानांवरील सर्वात मोठा हल्ला असल्याचे मानले जात आहे.
जड पाण्याची अणुभट्टी
अणुबाँब निर्मिती साठी आवश्यक असणाऱ्या ‘जड पाण्या’ची निर्मिती करणारी ही अणुभट्टी आहे. तिची हानी केल्याने जड पाण्याचे उत्पादन करण्याची इराणची क्षमता दुर्बळ झाली असल्याचे प्रतिपादन इस्रायलने केले आहे. इराणनेही या हल्ल्यात मोठी हानी झाल्याची बाब मान्य केली. मात्र, कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नाही, असा निर्धारही व्यक्त केला. इस्रालयनेही इराणला कोणत्याही परिस्थितीत अणुबाँब बनवू देणार नाही, या धोरणाचा पुनरुच्चार केला.
इराणचे 700 बळी
गेल्या आठ दिवसांमध्ये इस्रायलच्या हल्ल्यात इराणमध्ये 700 हून अधिक बळी गेले आहेत. त्यांच्यात 15 अणुशास्त्रज्ञ आणि इराणच्या क्रांतीकारी सेनेच्या प्रमुखांसह अनेक अधिकाऱ्यांचा समावेश आहे. इराणने केलेल्या हल्ल्यामध्ये मृत झालेल्या इस्रायली नागरीकांची संख्या 45 झाली आहे. इस्रायलचा कोणताही सैनिक मात्र, इराणच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेला नाही, अशी माहिती दिली गेली.
इस्रायलच्या शेअरबाजारावर हल्ला
इराणने इस्रायलच्या शेअरबाजाराच्या इमारतीवरही हल्ला केला आहे. ही इमारत तेल अवीव येथे आहे. मात्र, या इमारतीची फारशी क्षती या हल्ल्यात झालेली नसल्याचे दिसून येत आहे. काही क्षेपणास्त्रे नेम चुकल्याने अन्यत्र पडून निकामी झाली आहेत. गुरुवारी दिवसभरात इराणने 22 क्षेपणास्त्रे डागली आहेत.
इराणच्या तीन शहरांमध्ये स्फोट
गुरुवारी दुपारनंतर इस्रायलने चढविलेल्या व्यापक हल्ल्यात इराणची तीन शहरे सापडली. या शहरांमध्ये मोठे स्फोट झाल्याचे दिसून आले. अनेक इमारती ढासळल्या असून नागरीकांनी जीव वाचविण्याची धडपड चालविल्याचे दिसून आले. काही नागरीकांचा मृत्यू झाला असून मालमत्तेची हानी मोठ्या प्रमाणात झाली. इस्फाहान, शिराझ आणि केरमानशाह अशी या शहरांची नावे आहेत. इस्रायलकडून या शहरांना प्रथमच लक्ष्य बनविले गेले आहे. या शहरांमध्ये इराणच्या लष्कराची केंद्रे असून शस्त्रसाठेही आहेत, अशी माहिती दिली गेली. आतापर्यंत इस्रायलने इराणची अनेक क्षेपणास्त्रे आणि बाँब जागच्या जागीच निकामी केले आहेत.
अमेरिकेकडे लक्ष्य
अमेरिका इराणवर हल्ला करु शकते, असे संकेत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी बुधवारी दिले होते. त्यामुळे या संघर्षात अमेरिका उतरणार का, हा प्रश्न उत्सुकतेने चर्चिला जात आहे. इराणने आपली मुख्य अणुआस्थापने भूमीत खोलवर दडविलेली आहेत. तेथपर्यंत घुसून ती नष्ट करण्याची क्षमता असणारे बाँब आणि तसे बाँब वाहून नेण्याची क्षमता असणारी युद्ध विमाने केवळ अमेरिकेकडेच आहेत. त्यामुळे इराणची अणुक्षमता नष्ट करायची असल्यास अमेरिकेलाच ते उत्तरदायित्व आपल्या अंगावर घ्यावे लागणार आहे, असे अनेक तज्ञांचे मत आहे.
संघर्ष आघाडीवर दिवसभरात…
- इराणकडून इस्रायलच्या रुग्णालयावर आणि नागरी वस्त्यांवर मोठे हल्ले
- इस्रायलकडून प्रतिशोध, इराणमधील तीन शहरांमध्ये क्षेपणास्त्र, ड्रोन हल्ले
- इराणचा मोठा शस्त्रसाठा नष्ट झाला असणे शक्य, अमेरिकेवर आता लक्ष









