चिपळूण :
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटात गॅबियन भिंतींचा भराव कोसळणे बुधवारीही सुरुच असून पडलेले भगदाडही रुंदावत चालले आहे. परिणामी घाटाखालील पायथ्याशी वसलेल्या पेढे गावातील कुंभारवाडी आणि पानकरवाडीतील लोकवस्तीला धोका कायम आहे. बुधवारी राष्ट्रीय महामार्ग विभागाने जेसीबी आणि मनुष्यबळ लावत लोकवस्तीसह शेतीत आलेला चिखल काढण्याचे काम सुरू केले आहे. त्याचबरोबर घाटातील सिमेंट काँक्रिट रस्त्याच्या खालच्या मातीचीही धूप होत चालली असून भराव गावाच्या दिशेने सरकत आहे.
गेल्या मे महिन्यात आणि त्यानंतर या आठवड्यात मुसळधार पावसामुळे गॅबियन वॉलचा काही भाग कोसळल्याने मातीचा भराव घसरून पेढे गावातील कुंभारवाडी आणि पानकरवाडीमध्ये चिखलाचे साम्राज्य पसरले होते. स्थानिक ग्रामस्थांनी अनेकदा राष्ट्रीय महामार्ग आणि संबंधित ठेकेदाराकडे तक्रारी करून उपाययोजना करण्याची मागणी केली होती. मात्र संबंधितांनी वेळेवर लक्ष दिले नसल्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली होती. अखेर बुधवारी महामार्ग प्राधिकरणाने या भागात चिखल साफसफाई मोहीम हाती घेतली. गाळ आणि चिखल हटवण्यासाठी साहित्य आणि मनुष्यबळ तैनात करण्यात आले असून पेढे गावात गाळ काढण्याचे काम सुरू झाले आहे.
दरम्यान, बुधवारीही गॅबियन वॉलचा भराव वाहून जात असून तेथे आता मोठे भगदाड पडले आहे. लोखंडी सळ्याही बाहेर पडल्या आहेत. पुढे मोठ्या पावसात परिस्थिती याहून बिकट होईल, अशी स्थिती आहे. त्याचबरोबर सध्या वाहतूक सुरू असलेल्या काँक्रिट रस्त्याच्या खालील मातीच्या भरावाची धूप होत चालली आहे. त्यामुळे या पावसाळ्यात घाट त्रासदायक ठरणार, अशी चिन्हे दिसत आहेत. येत्या 2 दिवसात गॅबियन वॉलच्या कामावर प्लास्टिक टाकले जाणार असल्याचे महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. तर घाटातील गॅबियन भिंतींचा दर्जा अत्यंत खराब असून केवळ तात्पुरत्या उपायांनी धोका टाळता येणार नाही. संपूर्ण घाट परिसरात दीर्घकालीन आणि शाश्वत उपाययोजना करण्याची गरज आहे असल्याचे स्थानिक ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
- नियुक्त अधिकाऱ्यांना अधिक खबरदारीच्या सूचना
पेढेतील प्रकारानंतर प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांनी यासंदर्भात राष्ट्रीय महामार्गच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्यानंतर महामार्ग विभागाने गावात साफसफाई मोहीम हाती घेतली आहे. त्याचबरोबर प्रशासनाने पेढेतील ग्रामस्थांनाही यापूर्वीच तात्पुरत्या स्थलांतर नोटिसा दिल्याने बुधवारी तालुक्यातील धोकादायक ठिकाणांच्या नियुक्त अधिकाऱ्यांना अधिक खबरदारीच्या सूचना केल्या आहेत.








