1971 च्या पराभवाचा घेणार सूड : भारताचे करणार तुकडे
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
पाकिस्तानचे सैन्यप्रमुख सैयद आसीम मुनीर सध्या अमेरिकेत आहेत. अलिकडेच त्यांनी अमेरिकेतील पाकिस्तानी समुदायाला संबोधित केले आहे. यावेळी त्यांनी भारताविरोधात गरळ ओकली आहे. मे महिन्यात झालेल्या संघर्षात पाकिस्तानचा विजय झाल्याचा खोटा दावा करण्यासाठी त्यांनी या व्यासपीठाचा वापर केला. मुनीर यांनी यावेळी भारताला आव्हान देत 1971 च्या लाजिरवाण्या पराभवाचा सूड उगविण्याची शपथ घेतली. भारताला तोडून 1971 च्या युद्धाचा सूड उगविला जाणार आहे. आम्ही चीनसोबत मिळून भारताच्या विरोधात युद्ध लढल्याचा दावाही मुनीर यांनी केला आहे. तसेच मुनीर यानी 22 एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या हल्ल्याला दहशतवादी हल्ला मानण्यास नकार दिला.
सायबर हल्ल्याचा केला दावा
पाकिस्तानने भारताच्या विरोधात 5 आघाड्यांवर युद्ध लढले, ज्यात सायबर वॉरफेयर देखील सामील होते. पाकिस्तानी सायबर अटॅकर्सनी भारताची 70 टक्के ग्रिड स्टेशन्स हॅक केली होती, पाकिस्तानी ड्रोन्स दिल्ली आणि गुजरातपर्यंत पोहोचल्याचा असा खोटा दावा मुनीर यांनी केला.
काश्मीरसंबंधी वक्तव्य
भारताच्या विरोधातील संघर्षाकरता आम्हाला चीनकडून शस्त्रास्त्रs आणि सैन्य उपकरणे मिळाली होती. पाकिस्तानने त्यांचा ज्याप्रकारे वापर केला, ते पाहता चीनही अत्यंत प्रभावित झाला आहे. पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांसाठी अमेरिकाच जबाबदार आहे. अफगाणिस्तानात सोव्हियत महासंघाच्या आक्रमणानंतर पाकिस्तानात दहशतवादाची संस्कृती दाखल झाली आणि याकरता अमेरिकाच जबाबदार असल्याचे म्हणत मुनीर यांनी लवकरच काश्मीरसंबंधी चांगली बातमी कानावर पडणार, असा दावा केला आहे.









