सातारा :
सातारा नगरपालिकेच्या इमारतीमध्ये अनेकदा पावसाचे पाणी झिरपून आत आल्याचे प्रकार घडले होते. त्यामुळे पालिकेने डागडुजीसाठी निधीची तरतूद केली आहे. चार वर्षांपूर्वी छ. शिवाजी महाराज सभागृहात पावसाचे पाणी येत होते. त्याची दुरुस्ती केली होती. मात्र आता सुरू असलेल्या पावसाचे पाणी इनगेटच्या भिंतीवरून पाझरत आहे. तसेच छतावरही पाईपलाईन गळती सुरू आहे. त्यामुळे पालिकेच्या इमारतीतच समस्या असून, त्या दूर कराव्यात, अशी मागणी होऊ लागली आहे.
सातारा नगरपालिकेची इमारत जीर्ण झालेली आहे. यापूर्वी सातारा नगरपालिकेच्या इमारतीमध्ये छ. शिवाजी महाराज सभागृहात गळती लागून पावसाचे पाणी आल्याचे प्रकार घडले होते. त्यावेळी सभागृहात नगरसेवकांनी आवाज उठवल्यानंतर त्यावेळी तत्कालीन प्रशासनाने डागडुजी तसेच रंगरंगोटी केली होती. आता सुरू असलेल्या पावसाने समर्थ मंदिर ते छ. शाहू महाराज चौक या रस्ताच्या बाजूच्या गेटमध्ये भिंतीवरून पाणी टिपटिपत आहे. ते सरळ आतमध्ये येणाऱ्यांच्या अंगावर पडत आहे. ही समस्या दूर केली नाही तर भिंतीत पाणी मुरून धोका उद्भवण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर पालिकेच्या इमारतीच्या छतावर असलेल्या पाण्याच्या टाकीत पाणी सोडण्याची पाईपलाईन सुद्धा गेल्या चार दिवसांपासून बिघडलेली आहे. टेरेसवर त्याचेच पाणी साठले जात आहे. ते पाणी खाली इमारतीत शौचालयासाठी वापरले जाते. गेल्या चार दिवसांपासून ते पाणी वाया जात असून त्याबाबत पाणी पुरवठा विभागात विचारणा केली असता त्यांना याबाबत माहिती नव्हती. दरम्यान, त्यांनी दुरुस्ती करण्याबाबत संबंधितांना सूचना केल्या आहेत.








