सांगली :
गावभागात असणाऱ्या संग्राम चौकातील जय अपार्टमेंटमध्ये घर फोडून चोरट्यांनी साडेपाच लाखाचा ऐवज लंपास केला. ही घरफोडी भरदुपारी सोमवारी दुपारी 11 ते अडीच या दरम्यान झाली. याप्रकरणी किरण गजानन केसरे वय 50 रा. जय अपार्टमेंट सांगली यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत माहिती अशी की, गजबजलेल्या संग्राम चौकात असणाऱ्या जय अपार्टमेंटच्या फ्लॅट नंबर 13 मध्ये किरण केसरे रहातात. सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास ते फ्लॅट बंद करून बाहेर गेले होते. दुपारी तीनच्या सुमारास आल्यावर त्यांच्या फ्लॅटच्या दरवाजाचे कुलूप उघडे असल्याचे समोर आले. त्यांना शंका आली त्यामुळे त्यांनी आत जावून पाहिले असताचोरी झाल्याचे लक्षात आले.
त्यांनी तात्काळ याची माहिती सांगली शहर पोलिसांना दिली. सांगली शहर पोलिसांनी पाहणी केली श्वान पथकालाही पाचारण केले. श्वानानेही चोरट्यांचा माग काढला. पण चोरटे सापडले नाहीत. केसरे यांच्या घरातील कपाटात ठेवण्यात आलेल्या मौल्यवान वस्तू चोरीस गेल्या आहेत. त्यामध्ये सोन्याचे दागिने आणि इतर साहित्याचा समावेश आहे. एकूण पाच लाख 44 हजार रूपयेचे साहित्य चोरट्यांनी चोरून नेले. सांगली शहर पोलीस तपास करत आहेत. याठिकाणी येवून पोलीस उपअधीक्षक प्रणील गिल्डा तसेच सांगली शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय मोरे यांनी पाहणी केली.








