खेड :
पुणे-भोर मार्गे कोकणात जाणारा वरंधा घाट तीन महिन्यांसाठी अवजड वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. दरडी कोसळण्यासह रस्ता खचत असल्याने खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी तसे आदेशही पारित केले आहेत.
वरंधा घाट हा पुण्याहून भोर मार्गे कोकणात महाडला जातो. गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कमालीचा वाढला आहे. काही भागांमध्ये पूरसदृश स्थितीही निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी दरडी कोसळून वाहतूक ठप्प होण्याच्या घटनाही घडल्या आहेत. या घटनांमध्ये जीवितहानी झाली नसली तरी वाहतूक खंडित होण्याचे प्रकार घडले आहेत. मुसळधार पर्जन्यवृष्टी झाल्यानंतर वरंधा घाटात दरडी कोसळण्यासह रस्ता खचणे व माती वाहून जाणे यासारख्या घडणाऱ्या घटनांमुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर पुढील 3 महिने घाटातील सर्व प्रकारची अवजड वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे.








