अहमदाबाद विमान दुर्घटना काळात मानवतेचे दर्शन
वृत्तसंस्था / अहमदाबाद
एखादी दुर्घटना घडली की परिसरातील लोक घटनाग्रस्तांच्या साहाय्याला धावून येतात, असा अनुभव आहे. अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतरही या परिसरात मानवतेचे आणि संवेदनशीलतेचे अशा प्रकारचे दर्शन घडत आहे. दुर्घटनाग्रस्त विमान जवळच्या जेबी वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतीगृहावर कोसळले. त्यानंतर एकच हाहाकार उडाला. याचवेळी जवळच्या भागातील एका उद्योजकाने आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. त्याने ज्या प्रामाणिकपणाने दुर्घटनाग्रस्तांना साहाय्य केले, त्याची प्रशंसा आता सर्वत्र केली जात आहे. विशेषत: घटनास्थळी त्यांना दुर्घटनाग्रस्तांचे दागिने आणि इतर मौल्यवान वस्तू सापडल्या. त्या त्यांनी आता सरकारजमा केल्या आहेत. सरकार त्या संबंधितांना परत करणार आहे.
राजू पटेल (वय 56) असे या बांधकाम उद्योजकाचे नाव आहे. विमान कोसळल्याचे वृत्त कळताच ते आपल्या सहकाऱ्यांसह तेथे वेळ न वाया घालवता धावले. तेथे त्यांना धुराचे लोट, आगीच्या ज्वाळा आणि साहाय्यासाठी लोकांचा चाललेला आर्त आक्रोश असे दृष्य दिसले. त्यांनी त्वरित दुर्घटनाग्रस्तांना साहाय्य करुन त्यांचा जीव वाचविण्यासाठी, तसेच जखमींना रुग्णालयात पोहचविण्यासाठी कार्याला प्रारंभ केला. त्यावेळी त्यांच्याजवळ साधनेही नव्हती. तरीही त्यांनी उपलब्ध सामग्रीनिशी वेगाने कामाला प्रारंभ केला आणि शक्य तितके प्रयत्न केले.
प्रामाणिकपणाचे होत आहे कौतुक
घटनास्थळी राजू पटेल आणि त्यांच्या सहकाऱ्यांना दुर्घटनाग्रस्तांचे दागिने आणि इतर मौल्यवान वस्तू आढळून आल्या. त्यांनी त्या गोळा केल्या. वितळलेले सोने आणि दागिने असे मिळून जवळपास 70 तोळे सोने त्यांनी गोळा केले आणि ते त्वरित सरकारजमा केले आहे. आता सरकार या सोन्याच्या मालकांचा शोध घेऊन त्यांना ते परत देणार आहे. पटेल तशा परिस्थितीतही या मौल्यवान वस्तू गोळा करण्याचे प्रसंगावधान दाखविले आणि त्या वस्तू सरकारकडे दिल्या. या त्यांच्या प्रमाणिकपणासाठी त्यांची राज्य सरकारसह अनेकांनी प्रशंसा केली आहे.
जखमींसाठी साड्यांचा उपयोग
जखमींना रुणालयात घेऊन जाण्याकरीता त्यांना उचलण्यासाठी त्यांच्याकडे स्ट्रेचर इत्यादी सुविधा नव्हत्या. अशा वेळी त्यांनी आपल्या घरातून साड्या आणून त्यांच्या झोळ्या करुन जखमींना रुग्णालयात नेले. त्यांच्या या प्रयत्नांमुळे अनेक जखमींना वेळेवर उपचार मिळू शकले आहेत. तसेच, अनेकांचे प्राणही वेळेवर उपचार झाल्याने वाचू शकले आहेत. यासाठीही लोक त्यांना धन्यवाद देत आहेत. ते आणि त्यांचे सहकारी अगदी देवासारखे धावले, अशी प्रतिक्रिया दुर्घटनाग्रस्तांकडून येत आहे.









