8 आरोपींना अटक
वृत्तसंस्था/ गोपालपूर
ओडिशाच्या गंजाम जिल्ह्यातील गोपालपूर समुद्रकिनाल्यावर एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्काराची घटना घडली आहे. रविवारी संध्याकाळी विद्यार्थिनी स्वत:च्या मित्रासोबत समुद्र किनाऱ्यावर पोहोचली होती, तेथे त्यांच्यावर सुमारे 10 युवकांनी हल्ला करत विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार केला होता. तर विद्यार्थिनीच्या मित्राला बांधून ठेवले होते.
याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीनंतर सोमवारी गुन्हा नोंदविण्यात आला. भारतीय न्याय संहिदेच्या कलम 70 अंतर्गत सामूहिक बलात्काराचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी आतापर्यंत 8 आरोपींना अटक करत त्यांची चौकशी सुरू केली आहे. उर्वरित आरोपींच्या शोधासाठी विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले आहे.
पीडित विद्यार्थिनी एका खासगी वसतिगृहात राहून शिक्षण घेत आहे. तर तिचा मित्र देखील तिच्याच महाविद्यालयात शिकत आहे. हे दोघेही समुद्रकिनाऱ्यावर बसले असताना सुमारे 10 जणांचा समूह तेथे पोहोचला, प्रथम त्यांनी दोघांची छायाचित्रे काढली आणि ती इंटरनेटवर अपलोड करण्याची धमकी दिली. मग विद्यार्थिनीच्या मित्राला बळजबरीने खेचून दूर नेले. त्याला बांधून टाकत आरोपींनी विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार केला होता.









