वायव्य परिवहन मंडळाचा आदेश : 10 जुलैपर्यंत करता येणार प्रवास
बेळगाव : यंदाच्या शैक्षणिक वर्षाला 1 जूनपासून प्रारंभ झाला. शाळा सुरू झाल्याने विद्यार्थी आता बसपास मिळविण्याच्या लगबगीत आहेत. यासाठी परिवहन मंडळाने सेवासिंधू पोर्टलवरून अर्ज करण्याची मुभा दिली असून कर्नाटक वन, ग्राम वन केंद्रातून अर्जाद्वारे बसपास मिळविता येणार आहेत. मात्र काही तांत्रिक कारणास्तव बसपास मिळविण्यात अडचणी येत असून विद्यार्थ्यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. यासाठी वायव्य परिवहन मंडळाने बसपास मिळेपर्यंत प्राथमिक व माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी मोफत बसप्रवास परवानगीचा आदेश जारी केला आहे.
मात्र यासाठी अर्ज केलेली पावती, विद्यार्थी ओळखपत्र किंवा मुख्याध्यापकांच्या स्वाक्षरीचे फोटो ओळखपत्र दाखविणे बंधनकारक असून मोफत बसप्रवास 10 जुलैपर्यंत करता येणार आहे. 2025-26 च्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली आहे. यामुळे शाळा आवार विद्यार्थ्यांनी फुलू लागली आहेत. प्राथमिक, माध्यमिक व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना ईडीसीएस विभागाच्या सेवासिंधू पोर्टलवरून बसपाससाठी अर्ज करण्याचे व कर्नाटक वन व ग्राम वन केंद्रातून बसपास मिळविण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र ईडीसीएस विभागाच्या पोर्टलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने कर्नाटक वन व ग्राम वन केंद्रांवर बसपास मिळविण्यासाठी समस्या निर्माण झाल्या.
त्यामुळे विद्यार्थ्यांना सुरुवातीपासूनच धडे गिरवताना अडचणी येत आहेत. याची दखल घेऊन वायव्य परिवहन मंडळाने प्राथमिक व माध्यमिक विद्यार्थ्यांना जोपर्यंत बसपास मिळत नाही तोपर्यंत मोफत बसप्रवासाची परवानगी दिली आहे. मात्र यासाठी काही कागदपत्रे दाखविणे बंधनकारक करण्यात आले आहे. बसपाससाठी अर्ज केलेली पावती, विद्यार्थी ओळखपत्र, मुख्याध्यापकांची सही असलेले फोटो ओळखपत्र आदी बस वाहकांना दाखवावे लागणार आहे. पाससाठी अर्ज केलेल्या मार्गावरच प्रवास करता येणार आहे. यामुळे शालेय विद्यार्थ्यांना लाभ होणार असून मोफत बसप्रवास 10 जुलैपर्यंत असणार आहे. विद्यार्थ्यांना परिवहन मंडळाच्या शहरीय, उपनगरीय, सामान्य व एक्स्प्रेस बसमधून प्रवास करता येणार आहे.
तांत्रिक बिघाड…
ईडीसीएस विभागाने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याची दखल घेऊन आपली तांत्रिक समस्या सोडवून विद्यार्थ्यांना तात्काळ बसपासचे वितरण करणे गरजेचे बनले आहे. सेवासिंधू पोर्टलद्वारे अर्ज केला असला तरी तांत्रिक बिघाडामुळे कर्नाटक वन व ग्राम वन केंद्रातून पास मिळविताना मोठी समस्या निर्माण झाली आहे.









