बेळगाव : सायबर गुन्हेगार हे एखादी बँक केवळ एक दिवसाच्या नियोजनाने लुटत नाहीत, त्यासाठी अनेक दिवसांपासून ते योजना आखतात. त्यासाठी बँकांनी अतिशय सतर्क राहणे गरजेचे आहे, असे विचार सायबर गुन्हेगारीचा अभ्यास करणारे कोमल इन्फोटेकचे हेमंत देशमुख यांनी बोलताना व्यक्त केले. बेळगाव जिल्हा सहकारी बँक असोसिएशनच्यावतीने गेल्या शनिवारी सायबर गुन्हेगारीबाबत घ्यावयाच्या दक्षतांचे मार्गदर्शन करण्यासाठी एक दिवशीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मराठा बँकेच्या छत्रपती शिवाजी सभागृहात झालेल्या या शिबिरास मार्गदर्शन करण्यासाठी पुण्याहून हेमंत देशमुख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. जिल्हा बँक असोसिएशनचे उपाध्यक्ष बाळासाहेब काकतकर यांच्या आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना हेमंत देशमुख यांनी सायबर गुन्हेगारीबाबत रिझर्व्ह बँकेकडून येत असलेल्या नवनव्या सर्क्युलरची माहिती दिली. सायबर गुन्हेगारी काय आहे? गुन्हेगारी करण्यासाठी इंटरनेटचा कसा उपयोग केला जातो, याची माहितीही त्यांनी दिली. डेटा चोरणे आणि पैशांची लूट करणे हे सायबर गुन्हेगारांचे मुख्य उद्देश असतात. एखाद्या बँकेचा डेटा चोरून तो काळा बाजारात विकण्याचे काम सायबर गुन्हेगारांकडून केले जाते. त्यामुळे बँकेचे रिप्युटेशन कमी होते. त्यासाठी बँकांच्या सर्व डायरेक्टर्स आणि कर्मचारीवर्गाने नेहमीच सतर्क असणे गरजेचे आहे. त्यासाठी बँकेचा पासवर्ड हा किमान 12 ते 16 कॅरेक्टरचा असावा म्हणजे तो सहजासहजी शोधता येत नाही, असेही त्यांनी सांगितले. एवढेच नव्हे तर सायबर गुन्हेगारी टाळण्यासाठी आपला पासवर्ड 15 ते 21 दिवसांतून एकदा बदलावा, असेही ते म्हणाले.
दुसऱ्या सत्रात विसेल इन्फोटेक कंपनीचे सचिन गुंजीकर, फ्युचर कम्युनिकेशन्सचे प्रतिनिधी नितीन कदम यांनी सायबर सेक्युरिटीबाबत उपस्थितांमध्ये स्पर्धा घेतली. तिसऱ्या सत्रात इनोवेव कंपनीचे अमित लोकरे व इफिनिक्सचे डॉ. पवन फलक यांनी रिझर्व्ह बँक सायबर सेक्युरिटी कंप्लाईन्सबाबत मार्गदर्शन केले. त्यानंतर उपस्थितांना प्रशिक्षण प्रमाणपत्रे देण्यात आली. प्रारंभी बँकिंग असोसिएशन संचालकांच्या हस्ते पाहुण्यांचा सन्मान करण्यात आला. ही कार्यशाळा अत्यंत महत्त्वाची असून आम्ही असोसिएशनच्यावतीने जिह्यातील 38 बँकांना मार्गदर्शन करीत आहोत, अशी माहिती बाळासाहेब काकतकर यांनी दिली. असोसिएशनचे चेअरमन चुरमुरे यांचेही भाषण झाले. वाढत चाललेले सायबर क्राईम रोखण्यासाठी हे प्रशिक्षण महत्त्वाचे आहे, असे ते म्हणाले. मराठा बँकेचे चेअरमन बाळाराम पाटील, पायोनियर बँकेचे चेअरमन प्रदीप अष्टेकर, बसवेश्वर बँकेचे चेअरमन रमेश कळसन्नावर, तुकाराम बँकेचे चेअरमन प्रकाश मरगाळे यांच्यासह बेळगाव आणि परिसरातील अनेक बँकांचे संचालक, व्यवस्थापक, सीईओ उपस्थित होते. दैवज्ञ बँकेचे मंजुनाथ सेठ यांनी सूत्रसंचालन केले.









