एक सुवर्ण, तीन रौप्य पदकांची कमाई
बेळगाव : बेळगावची 13 वर्षांखालील युवा आघाडीची टेबल टेनिसपटू तनिष्का काळभैरवने विविध देशांत आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेमधून 1 सुवर्ण व 3 रौप्यपदक पटकावित बेळगावचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचविले आहे. ताश्कंद येथे विश्व टेबल टेनिस युथ स्पर्धेत 15 वर्षांखालील गटात उपांत्यपूर्व फेरीत तनिष्काने कझाखस्तानच्या झीयानिया हिचा 11-2, 11-1 व 11-3 अशा सेटमध्ये पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीत भारताच्या गोधील दानियाचा 11-5, 11-6, 12-10 अशा गेम्समध्ये पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात तनिष्काने उझ्बेकिस्तानच्या अदलिना कासिनोवाचा 11-3, 7-11, 11-8,
13-11 अशा गेम्समध्ये पराभव करून सुवर्णपदक पटकाविले. 13 वर्षांखालील गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत उझ्बेकिस्तानच्या दिलरोमोकोनचा 11-5, 11-4, 11-5 अशा गेम्समध्ये पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीत उझ्बेकिस्तानच्या इलोनोराचा 11-6, 12-10, 11-7 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. मात्र अंतिम सामन्यात भारताच्या गोधील दानियाने 11-3, 7-11, 9-11, 11-6, 9-11 अशा गेम्समध्ये पराभव केल्याने या स्पर्धेत तनिष्काला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
स्वीडन येथील हिलसिंगबॉर्ग येथे झालेल्या 13 वर्षांखालील एकेरीत उपांत्य फेरीच्या सामन्यात तनिष्काने फ्रान्सच्या चोईहुंगचा 11-7, 11-5, 11-7 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात मलेशियाच्या मोहद दानिया हिने 7-11, 5-11, 5-11 अशा गेम्समध्ये पराभव केला. नॉर्वे येथे झालेल्या विश्व टेबल टेनिस स्पर्धेत 13 वर्षांखालील गटात उपांत्य फेरीच्या सामन्यात नॉर्वेच्या मिरीयम होरोस्टेटचा 11-4, 11-7, 11-5 अशा गेम्समध्ये पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. मात्र अंतिम फेरीत कडव्या लढतीत मलेशियाच्या मोहद दानियाने 11-9, 7-11, 10-12, 11-6, 6-11 असा पराभव केला. त्यामुळे तनिष्काला रौप्यपदक मिळाले.तनिष्काने आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करताना एक सुवर्ण व तीन रौप्यपदके पटकाविली.









