वृत्तसंस्था / अमदाबाद
येथे झालेल्या 2025 च्या टेबल टेनिस हंगामातील अल्टिमेट टेबल टेनिस सांघिक स्पर्धेत यु मुम्बा संघाने अजिंक्यपद पटकाविताना जयपूर पेट्रीऑट्सचा 8-4 अशा फरकाने पराभव केला.
या अंतिम लढतीतील पहिल्या लढतीत पेट्रीऑट्सच्या कर्णधार कनक झा ने यु मुम्बाच्या फ्रान्सच्या लिलीयान बार्डेटचा 11-4 असा पराभव करुन पहिला गेम जिंकला. पण त्यानंतर फ्रान्सच्या बार्डेटने पुढील दोन गेम्स 11-5, 11-7 असे जिंकून ही लढत आपल्या संघाला जिंकून दिली. यामुळे यु मुम्बाने आघाडी घेतली. दुसऱ्या सामन्यात यु मुम्बाची कर्णधार बाराव्या मानांकित बेरेनडेटी झोक्सने जयपूर पेट्रीऑट्सच्या श्रीजा अकुलाचा 2-1 अशा गेम्समध्ये पराभव केला. मिश्र दुहेरीच्या सामन्यात झोक्स आणि आकाश पाल यांनी जयपूर पेट्रीऑट्सच्या जीत चंद्रा आणि ब्रिट इयरलँड यांचा 3-0 असा पराभव करत यु मुम्बाची आघाडी वाढविली. जयपूर पेट्रीऑट्सच्या चंद्राने एका सामन्यात यु मुम्बाच्या पी.बी. अभिनंदचा 2-1 असा पराभव केला. पण हा विजय यु मुम्बाला जेतेपदापासून रोखू शकला नाही. या स्पर्धेत यु मुम्बाने जेतेपदासह 60 लाख रुपयांचे बक्षीस तर उपविजेत्या जयपूर पेट्रीऑट्सने 40 लाख रुपयांचे बक्षीस मिळविले. दबंग दिल्ली आणि चॅलेंजर्स यांना प्रत्येकी 17.5 लाख रुपयांचे बक्षीस मिळाले.









