जयशंकर यांचा पुढाकार : पश्चिम आशियात तणावाची स्थिती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पश्चिम आशियात दीर्घकाळापासून तणावाचे वातावरण आहे. आता इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षाने हा तणाव अधिकच वाढला आहे. यामुळे व्यापक युद्ध होण्याची भीती वाढली आहे. या तणावादरम्यान स्थिती सामान्य करण्याचा प्रयत्नही जारी आहे. याच प्रयत्नांच्या अंतर्गत विदेशमंत्री एस. जयशंकर यांनी संयुक्त अरब अमिरात (युएई) आणि आर्मेनियाच्या विदेश मंत्र्यांशी फोनवरून चर्चा केली आहे.
संयुक्त अरब अमिरातचे उपपंतप्रधान आणि विदेशमंत्री शेख अब्दुल्ला बिन जायद अल नाहयान यांच्याशी पश्चिम आशियातील सद्यस्थिती आणि यात कूटनीतिच्या भूमिकेवर चर्चा केली. तसेच या मुद्द्यावर संपर्कात राहण्यावरही सहमती निर्माण झाल्याचे जयशंकर यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत म्हटले आहे. तर अन्य एका पोस्टमध्ये जयशंकर यांनी आर्मेनियाचे विदेशमंत्री अरारात मिर्जोयान यांच्याशी क्षेत्रातील स्थिती आणि सहकार्यावर चर्चा झाल्याचे सांगितले आहे.
संघर्षावर व्यक्त केली चिंता
इस्रायलने शुक्रवारी इराणच्या आण्विक प्रकल्पांना लक्ष्य करणारे हवाईहल्ले केले होते. या हल्ल्यांमध्ये इराणचे अनेक अणूशास्त्रज्ञ आणि वरिष्ठ सैन्याधिकारी मारले गेले होते. यानंतर इराणने देखील इस्रायलवर बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचा मारा केला होता. दोन्ही देशांमधील संघर्षावर चिंता व्यक्त करत भारतोन स्थितीवर नजर ठेवून असल्याचे म्हटले आहे. जयशंकर यांनी यापूर्वी इस्रायल आणि इराण या दोन्ही देशांच्या विदेश मंत्र्यांशी चर्चा केली होती.









