वनखात्याचे आवाहन : नागरिकात भीतीचे वातावरण, दोन दिवसात अस्वलाचा बंदोबस्त करणार
खानापूर : चापगाव येथे एका अस्वलाचा पिल्लासह वावर असल्याने शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रविवारी सकाळी पुन्हा अस्वल पिल्लासह रामा धबाले यांच्या दृष्टीस पडल्याने तातडीने वनखात्याला कळविण्यात आले. नंदगड विभागाच्या उपवनाधिकारी माधुरी दळवाई आणि शंकर तारिहाळ यांच्या पथकाने चापगाव येथे धाव घेतली. अस्वल वावरत असलेल्या परिसराची पाहणी केली. यावेळी अस्वलाचा ओरडण्याचा आवाज तसेच अस्वलही दृष्टीस पडल्याने वनखात्याने नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले असून, ध्वनीक्षेपकाद्वारे गावात दवंडी पिटविण्यात आली असून, अस्वल वावरत असलेल्या परिसरात नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
चापगाव परिसरात गेल्या चार दिवसापासून एक अस्वल आपल्या पिल्लासह वावरत असल्याचे शेतकऱ्यांच्या दृष्टीस पडले होते. फेंडू कुऱ्हाडे यांच्यावर अस्वल चाल करूनही आले होते. मात्र त्यांनी खबरदारी घेऊन आपली सुटका करून घेतली होती. पुन्हा रविवारी सकाळी रामा धबाले यांच्या दृष्टीस अस्वल आणि पिल्लू पडल्याने याबाबतची माहिती गावातील नागरिकांना दिली. तातडीने वनखात्याला माहिती देवून पाचारण करण्यात आले. वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी परिसराचा मागोवा घेतला. यावेळी वनखात्याच्या अधिकाऱ्यांनाही अस्वल दृष्टीस पडले. उपवनाधिकारी दळवाई यांनी वरिष्ठांना अस्वल वावरत असल्याची माहिती दिली. खानापूर विभागाचे वनाधिकारी श्रीकांत पाटील यांनी चापगाव परिसरात वन कर्मचाऱ्यांची बंदोबस्तासाठी नेमणूक करून गावात ध्वनीक्षेपकाद्वारे अस्वलाबाबत खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
अस्वलाचा बंदोबस्त करण्यासाठी प्रयत्न
याबाबत खानापूर विभागाचे वनाधिकारी श्रीकांत पाटील म्हणाले, अस्वलाचा वावर असल्याचे स्पष्ट झाले आहे. चापगाव गावाला लागूनच वनजमीन असल्याने अस्वल जंगलातून शेतवडीत आले असावे, पुढील दोन दिवसात अस्वलाला जंगलात परतवून लावण्यासाठी उपाययोजना केली जाईल, जर अस्वल जंगलात पुन्हा न जाता याच ठिकाणी ठाण मांडून राहिल्यास याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी याबाबतची माहिती देण्यात येईल, त्यानंतर वरिष्ठ अधिकारी अस्वलाच्या बंदोबस्तासाठी नियोजन करतील त्यानुसार अस्वलाच्या बंदोबस्तासाठी पुढील उपाययोजना हाती घेण्यात येईल, तोपर्यंत चापगाव परिसरातील नागरिकांनी सावधगिरी बाळगून रहावे, असे आवाहन वनाधिकाऱ्यांनी केले आहे.
ग्रा. पं. च्यावतीने आवाहन
अस्वलाच्या वावराने शेतकऱ्यात अधिक भीती निर्माण झाल्याने या भागातील शेतकऱ्यांनी सतर्कता राखावी, असे आवाहन ग्राम पंचायतीच्यावतीनेही करण्यात आले आहे. यावेळी ग्रा. पं. सदस्य मारुती चोपडे, नजीर सनदी, शंकर धबालेसह या भागातील शेतकरी उपस्थित होते.
पिल्लू असल्याने हल्ल्याची शक्यता
चापगाव परिसरात पहिल्यांदाचा अस्वलाचा वावर दिवसाढवळ्या होत असल्याने शेतकरी आणि नागरिकांत प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अगदी पेरणी हंगामाच्या वेळेतच अस्वलाचा वावर सुरू झाल्याने शेतकऱ्यांच्या पेरणीच्या हंगामाची कामे खोळंबली आहेत. पिल्लू असल्याने अस्वल हल्ला करू शकते. यामुळे वनखात्यानेही खबरदारी घेऊन अस्वलाचा बंदोबस्त करण्यासाठी उपाययोजना हाती घेतली आहे.









