वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताची महिला मल्ल तसेच 17 वर्षाखालील वयोगटात विश्व चॅम्पियन ठरणारी मानसी लाथेरने निवड चाचणी स्पर्धा जिंकून किर्जिस्थान येथे 5 ते 13 जुलै रोजी होणाऱ्या 20 वर्षाखालील वयोगटाच्या आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेचे तिकिट निश्चित केले.
मानसी लाथेरने निवड चाचणी स्पर्धेत 68 किलो वजन गटात आपला सहभाग दर्शविला होता. तिने या गटातील अंतिम लढतीत दिल्लीच्या सृष्टीचा पराभव केला. गेल्या मार्चमध्ये मानसीने वरिष्ठांच्या आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेत कांस्यपदक मिळविले होते. गेल्या महिन्यात झालेल्या यूडब्ल्यूडब्ल्यू मानांकन सिरीज मंगोलिया खुल्या कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक मिळविणारी महिला मल्ल मुस्कानने 57 किलो वजन गटात आपली पात्रता सिद्ध केली. मुस्कानने अंतिम लढतीत महाराष्ट्रच्या अश्लेषा कल्याणचा पराभव केला. किर्जिस्थानमध्ये होणाऱ्या आगामी आशियाई चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी विविध वजन गटात महिला मल्ल पात्र ठरले आहेत.
50 किलो गटात श्रृती, 53 किलो गटात सारिका, 50 किलो गटात रिना, 57 किलो गटात नेहार शर्मा, 62 किलो गटात अंजली, 72 किलो गटात हर्षिता, 76 किलो गटात काजल यांनी आपली पात्रता सिद्ध केली आहे. महिलांची ही निवड चाचणी स्पर्धा येथील इंदिरा गांधी स्टेडियमवर घेण्यात आली.
पुरुषांच्या फ्री स्टाईल आणि ग्रीको रोमन पद्धतीची निवड चाचणी स्पर्धा 14 जूनला लखनौमध्ये झाली. या चाचणीमध्ये फ्री स्टाईल विभागात 57 किलो गटात अंकुश, 61 किलो गटात अनूज, 65 किलो गटात अश्वानी, 70 किलो गटात सौरभ, 74 किलो गटात विवेक, 79 किलो गटात अमीत, 86 किलो गटात सचिन, 92 किलो गटात सचिन, 97 किलो गटात विशाल आणि 125 किलो गटात जेशपुरण यांनी आपली पात्रता सिद्ध केली. ग्रीकोरोमन विभागात 55 किलो गटात नितीन, 60 किलो गटात सुरज, 63 किलो गटात वरुण, 67 किलो गटात योगेश, 72 किलो गटात आकाश पुनिया, 77 किलो गटात सचिन, 82 किलो गटात प्रिन्स, 87 किलो गटात रोहित, 97 किलो गटात नमन आणि 130 किलो गटात जोगिंदर राठी पात्र ठरले आहेत.









