वृत्तसंस्था/ लंडन
ग्रँडमास्टर्स अर्जुन एरिगाईसी आणि प्रणव यांनी अंतिम दिवशी महत्त्वपूर्ण विजय नोंदवून ‘टीम एमजीडी1’ हा फिडे वर्ल्ड रॅपिड टीम चॅम्पियनशिप जिंकणारा पहिला भारतीय संघ बनला. सहाव्या क्रमांकावर असलेल्या ‘टीम एमजीडी1’ने तीन दिवसांत 12 फेऱ्यांमध्ये 10 विजय मिळवले आणि शुक्रवारी ‘टीम हेक्सामाइंड’शी झालेल्या चुरशीच्या लढतीनंतर विजेतेपद मिळवले.
गेल्या दोन आवृत्त्यांमध्ये रौप्य आणि कांस्यपदक जिंकल्यानंतर ‘एमजीडी1’ने पहिल्या दिवशी त्यांच्या मोहिमेची सुऊवात उत्तम केली. परंतु ‘टीम फ्रीडम’विऊद्ध बरोबरी आणि दुसऱ्या दिवशी ‘टीम हेक्सामाइंड’कडून झालेल्या पराभवामुळे त्यांना आव्हान जिवंत ठेवण्याच्या दृष्टीने निर्दोष कामगिरीची आवश्यकता होती. हे आव्हान पेलत संघाने शैलीत प्रतिसाद दिला. शेवटच्या दिवशी चारही फेऱ्या जिंकून त्यांनी जेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
ग्रँडमास्टर अर्जुन एरिगेसी, पेंटाला हरिकृष्ण, लिओन मेंडोन्सा, डेव्हिड आंतोन गुइजारो, त्सोलाकिडो स्टोव्हरौला, प्रणव, अथर्व तायडे आणि कर्णधार श्रीनाथ नारायणन यांचा समावेश असलेल्या ‘एमजीडी1’ने शेवटच्या फेरीत महत्त्वाचे विजय मिळवून विजेतेपद मिळवले. अर्जुन आणि प्रणव यांना मिळवलेले विजय निर्णायक ठरले.
‘हे खूप खास आहे. ऑलिंपियाडमध्ये भारतीय संघासमवेत असताना आम्ही जिंकण्याच्या दृष्टीने भक्कम दावेदार होतो आणि ‘टीम एमजीडी1’सोबत आम्ही अंडरडॉग होतो. तरीही आम्ही पुन्हा सुवर्णपदक जिंकले’, असे नारायणन याने म्हटले आहे. ‘टीम एमजीडी1’ने 21 गुण मिळविले आणि ‘टीम हेक्सामाइंड’पेक्षा एका गुणाने ते पुढे राहिले. विश्वनाथन आनंदचा समावेश असलेली टीम फ्रीडम 17 गुणांसह तिसऱ्या स्थानावर राहिली. जगातील तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू अर्जुन ‘टीम एमजीडी1’साठी अंतिम दिवसाचा स्टार ठरला. कारण त्याने 4 पैकी 3.5 गुण मिळवले. दुसऱ्या दिवशीच्या खराब खेळातून उसळी घेत त्याने ही कामगिरी केली. दुसऱ्या दिवशी तो फक्त अर्धा गुण मिळवू शकला होता.
शेवटच्या दिवशी अर्जुनने काझचेसचा ग्रँडमास्टर रिचर्ड रॅपोर्टवर विजय मिळवून सुऊवात केली आणि नंतर ताश्कंद ओपन 2025 चा विजेता ग्रँडमास्टर निहाल सरीन (अशदोद एलिट चेस क्लब) याच्या विरुद्धचा सामना त्याने जवळजवळ गमावल्यागत वाटत असताना त्याने बरोबरीत साधण्यात यश मिळविले. शेवटच्या दोन फेऱ्यांमध्ये अर्जुनने ग्रँडमास्टर जोस मार्टिनेझ (थीम इंटरनॅशनल ट्रेडिंग) आणि ल्यूक मॅकशेन यांना आरामात हरवले.









