महिला खासदारासह पती ठार : अन्य एक खासदार व पत्नी जखमी
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेतील मिनेसोटा येथील डेमोक्रॅटिक पार्टीच्या दोन खासदारांवर त्यांच्या निवासातच गोळ्या घालण्यात आल्या. पहिल्या घटनेत डेमोक्रॅटिक पक्षाचे खासदार मेलिसा हॉर्टमन यांच्यासह त्यांचे पती मार्क यांचा गोळीबारात मृत्यू झाला आहे. तर दुसऱ्या घटनेत मिनेसोटाचे सिनेटर जॉन हॉफमन आणि त्यांची पत्नी यवेट यांना अनेक गोळ्या लागल्यामुळे हे दाम्पत्य गंभीर जखमी झाले आहे. दोघांवरही शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्यांचे प्राण वाचण्याची आशा डॉक्टरांना आहे. पोलिसांनी तातडीने परिसरात शोध सुरू करत संशयिताचा शोध सुरू केला आहे. मिनेसोटाचे गव्हर्नर टिम वॉल्झ यांनी या गोळीबाराच्या घटनेविषयी अधिकृत माहिती जारी केली आहे. हा हल्ला राजकीय कारणांसाठी करण्यात आल्याचे वॉल्झ म्हणाले.
गोळीबार करण्यात आलेल्या दोन्ही खासदारांची घरे एकमेकांपासून 8 मैल (सुमारे 12 किलोमीटर) अंतरावर आहेत. भारतीय वेळेनुसार शनिवारी सकाळी 11:30 वाजता चॅम्पलिनमध्ये सिनेटर हॉफमन आणि त्यांची पत्नी यवेट यांच्यावर गोळीबार करण्यात आला. हॉफमन यांच्यावर किमान दोन झाडण्यात आल्या, तर पत्नी यवेट यांना तीन गोळ्या लागल्या आहेत. हे दाम्पत्य त्यांची मुलगी होपसोबत राहत होते. तथापि, घटनेच्या वेळी ती घरी नसल्याचे निदर्शनास आले आहे.
अन्य एका घटनेत खासदार मेलिसा हॉर्टमन आणि त्यांचा पती मार्क यांच्यावर ब्रुकलिन पार्क परिसरात हल्ला करण्यात आला. त्यांच्यावर झालेल्या गोळीबारात दोघांचाही मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे ब्रुकलिन पार्कमधील लोकांना घरातच राहण्यास सांगण्यात आले आहे. जर एखाद्या अज्ञात व्यक्तीने दार ठोठावले तर दरवाजा न उघडता प्रथम 911 वर कॉल करून कळवा, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. हा हल्ला राजकीय कारणांसाठी करण्यात आला की इतर काही कारणांसाठी हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, परंतु पोलीस वेगवेगळ्या दिशेने तपास करत आहेत.









