नवी दिल्ली :
अहमदाबाद येथे झालेल्या विमान अपघातासंबंधी देशातील विविध क्षेत्रांमधील मान्यवर त्यांची मते व्यक्त करीत आहेत. योगगुरु बाबा रामदेव यांनी ही दुर्घटना हा अपघात आहे की घातपात अशी शंका व्यक्त करतानाच त्यांनी तुर्किये या देशावर संशय व्यक्त केला आहे. या देशाने भारतावर अशा प्रकारे सूड उगविला असेल काय, याचीही चौकशी करावी, अशी सूचना त्यांनी केली आहे. पहलगाम येथे झालेल्या क्रूर इस्लामी दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने हाती घेतलेल्या ‘सिंदूर’ अभियानाच्या वेळी तुर्किये देशाने इस्लामी एकतेचे कारण पुढे करुन पाकिस्तानचे समर्थन केले होते आणि पाकिस्तानने तुर्कियेचे ड्रोन्स भारताविरोधात उपयोगात आणण्याचा प्रयत्न केला होता. तथापि, भारताने तो हाणून पाडला होता.
नंतर भारताने तुर्कियेलाही धडा शिकविताना त्याच्याशी असलेले सर्व आर्थिक संबंध तोडण्याचा निर्णय घेतला होता. तसेच भारतीय पर्यटकांनाही तुर्कियेला न जाण्याचे आवाहन केले होते. असंख्य भारतीय नागरीकांनी या देशाला जाण्यासाठी केलेली बुकींग रद्द पेलेली आहेत. त्यामुळे तुर्कियेच्या पर्यटन व्यवसायाची मोठी हानी झाली होती. तुर्कियेने पाकिस्तानला दिलेली युद्धसामग्री पूर्णत: कुचकामाची ठरल्याने त्या देशाचा जळफळाट झाला होता. या साऱ्या घटनांचा सूड त्या देशाने अहमदाबाद येथे विमान दुर्घटना घडवून आणून घेतला असेल काय, असा रामदेव बाबांचा प्रश्न आहे. अर्थात, दुर्घटनेचे नेमके कारण कोणते होते, हे अन्वेषणानंतरच समजणार आहे. अन्वेषणाचा अहवाल दोन-तीन महिन्यांमध्ये अपेक्षित आहे.









