कराड :
नव्याने उभारण्यात येत असलेल्या कराड उड्डाणपुलाच्या कामाचा वेग वाढला असून सध्या सिगमेंट बसवण्याचे काम अंतिम टप्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून कोल्हापूर नाक्यावरून कराड शहरात येण्यासाठी महत्त्वाचा असलेला वळणमार्ग शुक्रवारपासून बंद करण्यात आला आहे. यामुळे शहरात येणाऱ्या व निघणाऱ्या वाहनचालकांची मात्र मोठी गैरसोय होत आहे.
दरम्यान, कराड वाहतूक शाखेचे संदीप सूर्यवंशी, उपनिरीक्षक राजेंद्र घाडगे, संतोष जगदाळे, दस्तगीर आगा यांच्यासह अदानी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दुपारी पाहणी केली. त्यांनी केलेल्या पाहणीनंतर कोल्हापूर नाक्यावरील आय लव्ह कराड सेल्फी पॉईंटपासून शहरात येण्यासाठी वळणमार्ग करण्याचे ठरले. त्यानुसार काम सुरू झाले आहे. शनिवारी १४ रोजी हा सकाळी हा मार्ग कदाचित खुला केला जाईल. वाहनचालकांना वारूंजी फाट्याचा पर्यायी मार्ग वळणमार्ग बंद असल्याने कोल्हापूर बाजूकडून कराडमध्ये येणाऱ्या वाहनांना आता वारूंजी फाटा मार्गे वळसा घालून जुन्या कोयनापुलावरून शहरात प्रवेश करावा लागत आहे. परिणामी जुन्या कोयना पुलावर वाहनांची कोंडी वाढली असून वाहतूक अधिकाधिक वेळखाऊ बनत आहे. सिगमेंट बसवण्याचे काम युद्धपातळीवर सध्या पावसाचा जोर अधूनमधून कमी-जास्त होत असल्यामुळे या कालावधीत काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात येतो आहे. सिगमेंट बसवण्याचे काम पूर्ण होताच वळणमार्ग पुन्हा खुला करण्यात येईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, काही दुचाकीस्वार वळणमार्ग बंद असूनही सिमेंट ब्लॉकमधून घुसखोरी करत शहरात शिरत आहेत. पुण्याकडून येणाऱ्या भरधाव वाहनांमुळे अपघात होवून अशा वाहनचालकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. विशेषतः शालेय वेळा, कार्यालयीन गर्दीच्या वेळात वाहतूक कोंडी होत आहे
- शिंगण करणार रास्तारोको
पावसाळ्यात उड्डाणपुलाच्या कामाने अनेक नवनवे वळणमार्ग तयार होत असून वाहनधारकांची गैरसोय होत असल्याचा आरोप दादासाहेब शिंगण यांनी केला. या विरोधात आवाज उठवण्यासाठी शनिवारी रस्त्यावर बसून आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. अनेक निष्पाप बळी आजपर्यंत गेले असून यापुढे असे अपघात होऊ नयेत, यासाठी उपाययोजना करण्याची त्यांची प्रमुख मागणी आहे.
- उड्डाणपुलाखालील नवा रस्ता वाहतुकीस खुला
मलकापूर येथील ढेबेवाडी फाटा ते डी मार्टपर्यंतच्या नव्या उड्डाणपुलाखालील रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण झाले आहे. शुक्रवारी हा रस्ता हायवेच्या वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. त्यामुळे ढेबेवाडी फाट्यापासून पुढे सेवारस्त्यावरील वाहतूक ही केवळ स्थानिकच राहिल. साहजिकच या परिसरातील वाहतूक कोंडी कमी झाली आहे. कोल्हापूर नाक्यापासून तयार करण्यात आलेला उड्डाणपुलाखालील रस्ताही लवकरच खुला करण्याचा प्रयत्न असल्याचे दस्तगीर आगा यांनी सांगितले.








