कोल्हापूर / राजेंद्र होळकर :
शहरातील दुधाळी सांडपाणी प्रक्रिया केंद्राची 17 एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याची क्षमता असली तरीदेखील प्रत्यक्षात या केंद्रात 19 एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रिया केली जात आहे. प्रक्रिया केलेल्या पाण्यापैकी काही पाणी लगतच्या 10 एकर शेतीला मोफत पुरविण्यात आले आहे. तर उरलेले प्रक्रिया केलेले पाणी पंचगंगा नदीमध्ये सोडले जात आहे.
सुमारे नऊ वर्षापूर्वी महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत पंचगंगा नदीत मिसळणाऱ्या 12 नाल्यापैकी महत्वाचा नाला असलेल्या दुधाळी नाल्यावर बांधा वापरा आणि हस्तरण करा. या तत्वावरील 17 एमएलडीचा सांडपाणी प्रकल्प उभारणीच्या कामाला मान्यता देण्यात आली. या प्रकल्पाचे काम लक्ष्मी सिव्हील इंजिनिअरिंग कंपनीला देण्यात आले. या कंपनीने वेळेत या प्रकल्पाची उभारणी कऊन, शहराच्या पश्चिम भागातून येणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यास सुऊवात केली आहे. याला आता 7 वर्षे पूर्ण झाली असून, या कंपनीची अद्यापी 6 वर्षे शिल्लक आहेत. या 6 वर्षाचा कालावधी संपल्यानंतर हा प्रकल्प महानगरपालिकेच्या ताब्यात येणार आहे.
लक्ष्मी सिव्हील इंजिनिअरिंग कंपनीने या प्रकल्पावर सांडपाण्यावरील प्रक्रिया करण्यामध्ये दर्जा राखण्याचे काम कौशल्यपूर्ण करीत आहे. इचलकरंजीत शहरातील सांडपाणी प्रक्रिया केंद्रात येणाऱ्या सांडपाण्यात दिसून येणारा सीओडी केमिकल ऑक्सीजन डिमांड या सांडपाणी केंद्रात येणाऱ्या सांडपाण्यात दिसून येत नाही.
- आणखीन 6 एमएलडीचा प्रकल्प पुर्णत्वाकडे
सर्वाधिक सांडपाणी वाहून नेणारा दुधाळी हा शहरातील दुसऱ्या क्रंमाकाचा नाला आहे. या नाल्यावर 17 एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प उभारण्यात आला आहे. त्याच्या शेजारी अमृत योजना दोन मधून आणखीन एक सहा एमएलडी क्षमतेचा जादा प्रक्रिया करणारा प्रकल्प उभारण्यात येत आहे. त्याचे काम 90 टक्याहून अधिक पूर्ण झाले असून, उरलेले काम देखील येत्या काही दिवसात पूर्ण होवून, हा प्रकल्प पावसाळा संपण्यापूर्वी सुऊ होण्याची शक्यता नाकारता येत आहे.
सांडपाण्यावर फुलली ऊस शेती
दुधाळी येथील 17 एमएलडी सांडपाणी प्रक्रिया केंद्रामुळे पंचगंगा नदीचे जलप्रदूषण कमी करण्यास मोठी मदत झाल्याचे दिसून येत आहे. तसेच या केंद्राशेजारच्या शेतकऱ्यांना या सांडपाणी प्रक्रिया केंद्राचा मोठा फायदा झाल्या असून, त्यांना या केंद्राच्या व्यवस्थापनाकडून प्रक्रिया केलेले सांडपाणी विनामोबदला पुरविले जात आहे. या प्रक्रिया केलेल्या सांडपाण्यावर 10 एकर शेतात ऊस लावला आहे. त्याचबरोबर या शेतकऱ्यांना शेतपिकासाठी भूगर्भातील पाणी पंपाने उपसण्याच्या खर्चात बचत सुध्दा झाली आहे.
स्लज शेतकऱ्यासाठी वरदान
सांडपाणी प्रक्रियामध्ये सांडपाण्यातील गाळ वेगळा केला जातो. त्याला स्लज असे म्हणतात. या स्लजचा वापर खत (बायोसोलिड्स) म्हणून शेतकरी कऊ लागले आहेत. वर्षाला या केंद्रात सुमारे 200 टॉली स्लज निघतो आहे. ते स्लज (खत) शेतकऱ्यांना विनामोबदला दिले जात आहे. यावर्षी या केंद्रातून 200 टॉली स्लज (खत) शेतकऱ्यांनी घेवून गेले आहेत, अशी माहिती या केंद्राच्या व्यवस्थापन कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली.
- 17 कर्मचारी पाहतात हे केंद्र
दुधाळी येथील 17 एमएलडी सांडपाणी प्रक्रिया जे केंद्र आहे. या केंद्राची 15 कर्मचारी 2 सुरक्षा रक्षक असे 17 जण जबाबदारी पार पाडत असून, दिवसा 11 कर्मचारी आणि एक सुरक्षा रक्षक असे काम करीत आहेत. तर रात्रीच्या वेळी 4 कर्मचारी आणि एक सुरक्षा रक्षक काम पाहत आहेत.
- पर्यावरण विषयाच्या विद्यार्थ्यासाठी प्रशिक्षण केंद्र
दुधाळी सांडपाणी प्रक्रिया केंद्राची उभारणी करताना अत्याधुनिक यंत्रेचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे या केंद्रात सांडपाण्यावर तंत्रशुध्द प्रक्रिया केली जाते आहे. याची विशेष दखल घेवून शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरण विभागाबरोबर शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय, केआयटी कॉलेज, डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज, सायबर कॉलेज अशा नामवंत कॉलेजमधील पर्यावरण विषयाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्यासाठी या केंद्रामध्ये मोफत प्रशिक्षण दिले जात असून, सध्या या केंद्रामध्ये सायबर कॉलेजच्या तीन विद्यार्थ्यांना गेल्या पंधरा दिवसापासून प्रशिक्षण दिले जात आहे. 15 दिवसापासून 3 महिन्यापर्यंत विद्यार्थ्याना प्रशिक्षण दिले जात आहे.
- फळाच्या झाडाची लागवड
या सांडपाणी प्रक्रिया केंद्रात या केंद्राची व्यवस्थापन पाहणाऱ्या कंपनीने पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी या केंद्राच्या जागेत आंबा, फणस, पेऊ, केळी अशा फळ झाडाबरोबर काही फुलाची झाडेसुध्दा लावली आहे.








