सुभाशिष सिकदरला बंगालमध्ये अटक : आतापर्यंत आठजण पोलिस कोठडीत
पणजी : सर्व शिक्षा अभियानाच्या बँक ऑफ इंडियामधील खात्यातून 5 कोटी 36 लाख 3 हजार ऊपये बनावट पद्धतीने काढण्याच्या प्रकरणातील मुख्य सूत्रधारासह आणखी एका संशयिताला गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी बंगाल येथे अटक केली आहे. दोन्ही संशयितांना गोव्यात आणून त्यांच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 336(1), 336(2), 336(3), 338, 340(2), 318 आणि 61 अंतर्गत पर्वरी पोलिसस्थानकात गुन्हा क्रमांक 44/2025 शी संबंधित गुन्हा दाखल केला आहे. सुरुवातीला हे प्रकरण पर्वरी पोलिसस्थानकात नोंद झाले होते. पर्वरी पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करताना सहा संशयितांना अटक केली होती. मात्र या प्रकरणातील मुख्य संशयित त्यांच्या हाती लागला नव्हता. नंतर हे प्रकरण गुन्हा अन्वेषण विभागाकडे देण्यात आले होते. गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करताना या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्य सूत्रधाराचे नाव सुभाशिष सुकुमार सिकदर (घर क्रमांक 87/ए, जोधपूर गार्डन, कोलकाता, बंगाल), मृगांका मोहन जोआर्डर (37 राहामापूर, जिल्हा नादिया, बंगाल) दोन्ही संशयितांना बंगालमध्ये अटक करून गोव्यात आणण्यात आले आहे. संशयितांचे मोबाईल फोन आणि सीमकार्ड पुढील चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. आतापर्यंत या प्रकरणात आठ संशयितांना अटक करण्यात आली असून पर्वरी पोलिसांनी अटक केलेल्या संशयितांमध्ये रॉबिन लक्ष्मीकांत पॉल, पूर्णाशिष श्यामसुंदर साना, विद्याधर माधवानंद मल्लिक व सुमंता संतोष मोंडल आणि आलामिन मोंडल यांचा समावेश असून सर्वजण बंगालमधील आहेत. संशयित सुभाशिष सिकदर हा सर्व शिक्षा अभियानाच्या बँक ऑफ इंडिया, पर्वरी शाखेतील खात्यातून 1 कोटी 8 लाख ऊपये बेकायदेशीरपणे काढण्याच्या आर्थिक फसवणुकीचा सूत्रधार आहे. त्याने अलामिन मोंडल नावाच्या सहकाऱ्यामार्फत बँक ऑफ बडोदा खात्यात (खाते क्रमांक 3868020000666) अनधिकृत प्रवेश मिळवला आणि सरकारी निधी काढण्यासाठी बनावट धनादेशांचा वापर केला. फसवणुकीचे नियोजन आणि अंमलबजावणी करण्यात सुभाशिषने मध्यवर्ती भूमिका बजावली आणि चोरीचे पैसे बनावट ओळखपत्राद्वारे बनावट खात्यात हस्तांतरीत केले, असे तपासात उघड झाले आहे.









