शेडमध्ये गळा दाबून खून केल्याचे उघड
बेळगाव : घस्टोळी दड्डी (ता. खानापूर) येथील एका गवंडी कामगाराचा गळा आवळून खून करण्यात आला आहे. सुळगा (हिंडलगा) येथील एका शेडमध्ये ही घटना घडली असून शुक्रवारी सकाळी खुनाचा प्रकार उघडकीस आला आहे. त्याचा खून कोणी व कशासाठी केला? याचा उलगडा झाला नाही. कुबेर देमण्णा दळवाई (वय 36, रा. घस्टोळी दड्डी) असे त्याचे नाव आहे. एका खासगी लेआऊटमध्ये तो गवंडी काम करीत होता. याच परिसरातील शेडमध्ये कुबेर व त्याचे अन्य साथीदार वास्तव्य करून होते. शुक्रवारी 13 जून रोजी सकाळी कुबेरचा खून झाल्याचे उघडकीस आले. शेडमध्ये मृतदेह आढळून आला आहे. घटनेची माहिती समजताच काकतीचे पोलीस निरीक्षक सुरेश शिंगे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. कुबेरच्या कुटुंबीयांना या घटनेची माहिती देण्यात आली आहे. शनिवारी सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात त्याच्या मृतदेहावर उत्तरीय तपासणी करण्यात येणार आहे. खुनानंतर शेडमधील त्याचे साथीदारही फरारी आहेत, अशी माहिती मिळाली असून त्यांची चौकशी झाल्यानंतरच याविषयी अधिक माहिती बाहेर पडणार आहे.









