दहा लाखांच्या भरपाईची विणकर संघटनेची मागणी
बेळगाव : बेळगाव शहर व जिल्ह्यात विणकरांच्या आत्महत्या सुरूच आहेत. देशनूर, ता. बैलहोंगल येथील एका कर्जबाजारी विणकराने गावातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली. नेसरगी पोलीस स्थानकात घटनेची नोंद झाली आहे. विश्वनाथ बाबू गोंदकर (वय 42) राहणार देशनूर असे त्याचे नाव आहे. गावाजवळील एका विहिरीत शुक्रवारी सकाळी त्याचा मृतदेह आढळून आला आहे. उदरनिर्वाहासाठी विश्वनाथने अनेक ठिकाणी हातउसने पैसे घेतले होते. कर्जाचे ओझे वाढल्याने त्याची परतफेड करण्याच्या चिंतेने त्याने आपले जीवन संपविले आहे.
दरम्यान, कर्नाटक राज्य विणकर सेवा
संघटनेच्या अध्यक्षांनी विश्वनाथच्या कुटुंबीयांना दहा लाखांची भरपाई देण्याची मागणी केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना यासंबंधी निवेदन दिले असून राज्यात 5 ते 6 लाख विणकर कामगार आहेत. गवंडी कामगारांना ज्या पद्धतीने सोयीसुविधा मिळतात, त्याच पद्धतीने विणकरांनाही सुविधा पुरविण्याची मागणी केली आहे. राज्यातील विणकराची ही 54 वी आत्महत्या आहे. मुख्यमंत्र्यांनी विणकर संघटनांच्या नेत्यांशी चर्चा करावी, राज्य व केंद्र सरकारने विणकरांचे कर्ज माफ करावे, अशा दुर्घटना टाळण्यासाठी विणकरांना न्याय द्यावा. नहून तीव्र आंदोलनाचा इशारा संघटनेचे राज्य अध्यक्ष शिवलिंग टिरकी यांनी दिला आहे.









