राजापूर :
तालुक्यातील रायपाटण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे एका नवजात बालकाचा मृत्यू झाल्याचा आणि प्रसुती झालेल्या त्या मातेचे गर्भाशय काढावे लागल्याचा आरोप नातेवाईकांनी ठेवला आहे. या प्रकरणी राजापूर पोलीस ठाण्यात दोन डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. राम मेस्त्री आणि डॉ. डवरी अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची नावे आहेत.
या प्रकरणी तेजेश दीपक रायबागकर (36,रा. पाचल बाजारपेठ, राजापूर) यांनी राजापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. तेजेश यांची पत्नी तृप्ती रायबागकर यांना 30 मार्च 2025 रोजी पहाटे 3.30 वाजता प्रसुतीसाठी रायपाटण ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी डॉ. डवरी यांनी प्रकृती गंभीर असतानाही तृप्ती यांना वेळेवर दुसऱ्या रुग्णालयात रेफर केले नाही आणि सायंकाळपर्यंत रायपाटण ग्रामीण रुग्णालयातच थांबवून ठेवल्याचे रायबागकर यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे.








