विद्यार्थ्यांसह प्रवाशांची गैरसोय
बेळगाव : जिल्हाधिकारी कार्यालयासमोरून बसथांबा मागील दोन दिवसापासून काढण्यात आला आहे. त्यामुळे शालेय विद्यार्थी तसेच प्रवाशांना शुक्रवारी पावसामध्ये थांबण्याची वेळ आली. बसथांबा नेमका कोणत्या कारणासाठी काढण्यात आला? असा प्रश्न प्रवासी वर्गातून विचारण्यात येत आहे. राणी चन्नम्मा चौकापासून कोर्ट रोडपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला बसथांबे आहेत. शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी या बसथांब्यातून ये-जा करित असतात. तसेच जिल्हाधिकारी कार्यालय व न्यायालयात येणाऱ्या नागरिकांनाही हे बसथांबे सोयीचे ठरत होते. परंतु मागील दोन दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील बसथांबा काढण्यात आला. आधीच शहरातील बसथांब्यांची दुरवस्था झाली असताना आता बसथांबेच काढले जात असल्याने प्रवासी वर्गातून नाराजी व्यक्त होत आहे. बसथांबा काढण्यात आल्याने नागरिकांना बाजूच्या भिंतीवर बसावे लागत आहे. यामध्ये महिला वर्गाची सर्वाधिक गैरसोय होत आहे. सध्या पावसाला सुरुवात झाली असून बसथांबा नसल्याने प्रवाशांना भिजत बसची वाट पहावी लागत आहे. त्यामुळे याठिकाणी पुन्हा बसथांबा तयार करावा, अशी मागणी प्रवाशांतून होत आहे.









