घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त : जमिनीचा हक्क सोडणार नसल्याचा ग्रामस्थांचा इशारा
वार्ताहर/कडोली
देवगिरी येथील त्या वाद्ग्रस्त स्मशानभूमीचा सर्व्हे करण्याचा प्रयत्न हाणून पाडल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. वडिलोपार्जित काळापासून देवगिरी ग्रामस्थांकडे वापरात असलेली जमीन संबंधित व्यक्तीकडून कब्जा घेण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. ही स्मशानभूमीची जमीन देवगिरी ग्रामस्थांसाठी अबाधित रहावी यासाठी याअगोदर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले होते. 1 एकर 16 गुंठे जमीन लिंगायत स्मशानभूमीसाठी ठेवण्यात आली होती. मात्र, या जागेवर एका व्यक्तीने आपला हक्क सांगितल्याने निदर्शने करण्यात आली.
स्मशानभूमी त्याच ठिकाणी ठेवावी, जमिनीचा हक्क सोडणार नाही, असा देवगिरी ग्रामस्थांचा नारा आहे. असे असताना शुक्रवारी दुपारी संबंधित व्यक्तीने सर्व्हे ऑफीसकडून सर्व्हे करण्याचा प्रयत्न झाला. ही बातमी समजताच शेकडो ग्रामस्थ एकत्र येऊन सदर प्रयत्न हाणून पाडला. घटनास्थळी अनुचित प्रकार घडू नये यासाठी काकती पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुरेश शिंगे, उपनिरीक्षक मंजुनाथ हुलगुंद हे पोलीस फौजफाटा घेवून हजर झाले. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांचे सचिव मलगौडा पाटील यांच्याकडे ग्रामस्थांनी समस्या मांडल्या. यावेळी पीडीओ कृष्णाबाई भंडारी, तलाठी मुल्ला, काकती सर्कल, डेप्युटी तहसीलदार साळुंखे, गौडाप्पा पाटील, देवगिरीतील आजी-माजी ग्रा.पं. सदस्य, ग्रामस्थ, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.









