किल्ला परिसरातील वाहनधारकांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव : बेळगावच्या जुना धारवाड रोड व किल्ला परिसरात मागील 50 वर्षांपासून प्रवासी वाहनांसह मालवाहतुकीची वाहने पार्किंग केली जातात. परंतु, कॅन्टोन्मेंट तसेच पोलिसांकडून वाहनचालकांना हटविले जात आहे. यामुळे वाहनचालकांच्या रोजगारावर परिणाम होत असून या ठिकाणच्या वाहनांवर कोणतीही कारवाई करू नये, अशी मागणी बेळगाव गुड्स टेम्पो ओनर्स असोसिएशनच्यावतीने शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली. लाखो रुपयांचे कर्ज काढून वाहनचालकांनी वाहने खरेदी केली आहेत. त्यांचा व्यवसाय हा शहराच्या मध्यवर्ती भागात असल्यामुळे त्यांना किल्ला परिसरात पार्किंग करणे सोयीचे ठरते. मागील अनेक वर्षांपासून या ठिकाणी प्रवासी तसेच मालवाहतूक करणारी वाहने पार्किंग केली जातात.
ग्रामीण भागातून शहरात प्रवेश करणारे प्रवासी तसेच मालवाहतूकधारक काहीवेळ वाहने पार्किंग करून पुन्हा माघारी फिरत असतात. मागील काही दिवसांपासून कॅन्टोन्मेंट बोर्ड तसेच पोलिसांकडून वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. तसेच या ठिकाणी वाहने उभी करू नयेत, अशी सूचना केली जात आहे. बऱ्याचवेळा वादावादीचे प्रकार देखील घडत असून वाहनचालक आर्थिक अडचणीत सापडत आहेत. त्यामुळे कॅन्टोन्मेंट व पोलिसांनी ही कारवाई तात्काळ थांबवण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी द्यावेत, अशी मागणी वाहनचालक-मालकांच्यावतीने करण्यात आली. यावेळी अॅड. अण्णासाहेब घोरपडे, एस. बी. देसाई यांच्यासह मोठ्या संख्येने वाहनचालक उपस्थित होते.









