आयएसएसएफ वर्ल्ड कप नेमबाजी स्पर्धा
वृत्तसंस्था/ म्युनिक, जर्मनी
भारताची नवी गोल्डन गर्ल सुरुची सिंगने नामवंत नेमबाजांचा सहभाग असलेल्या आयएसएसएफ वर्ल्ड कपमध्ये सलग तिसरे सुवर्ण मिळविताना महिलांच्या 10 मी. एअर पिस्तुल प्रकारात जेतेपद पटकावले. तिची ही तिसरी वर्ल्ड कप स्पर्धा असून 19 वर्षीय सुरुचीने सुवर्णपदकाची हॅट्ट्रिक तर एकंदर चौथे वैयक्तिक सुवर्ण मिळविले. एप्रिलमध्ये ब्युनॉस एअर्स व लिमा येथे झालेल्या स्पर्धेतही तिने सुवर्ण मिळविले होते. तिने अंतिम फेरीत 241.9 गुण नोंदवत पहिले स्थान पटकावले. कांस्य मिळविणाऱ्या चीनच्या कियाझुन याओला (221.7) मागे टाकत 10.5 गुणांची आघाडी घेतली तर रौप्य मिळविणाऱ्या फ्रान्सच्या कॅमिले जेद्रेजेवस्कीला (241.7) 9.5 गुण मिळविता आले. सुरुचीने शेवटच्या शॉटमध्ये 9.5 गुण नोंदवल्याने तिचे सुवर्णपदक निश्चित झाले तर जेद्रेजेवस्कीने 9.8 गुण मिळविले.
पात्रता फेरीत सुरुचीला 588 गुणांसह दुसरे स्थान मिळाले होते तर दुहेरी ऑलिम्पिक पदकविजेती मनू भाकरला 574 गुणांसह 25 वे स्थान मिळाले होते. अंतिम फेरीवेळी मनू भाकर समालोचन करीत होते आणि सुरुचीने सुवर्ण मिळविल्यानंतर तिने आनंद व्यक्त केला.









