वृत्तसंस्था / अँटवर्प
आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या पुरुषांच्या प्रो लीग हॉकी स्पर्धेत भारतीय पुरुष हॉकी संघाला यापूर्वी सलग चार सामन्यांत हार पत्करावी लागली असून आता हा संघ शनिवारी येथे होणाऱ्या बलाढ्या ऑस्ट्रेलिया संघाबरोबरच्या सामन्यात विजयासाठी मुसंडी मारण्याचा प्रयत्न करेल.
पुरुषांच्या प्रो लीग हॉकी स्पर्धेचा युरोपियन टप्पा भारतीय पुरुष हॉकी संघाला अत्यंत निराशा जनक ठरला आहे. या टप्प्यात हरमनप्रित सिंगच्या नेतृत्वाखालील भारतीय पुरुष हॉकी संघाने सलग चार सामने गमविले आहेत. अॅमस्टेव्हेलीन येथे झालेल्या दोन सामन्यांत ऑलिम्पिक चॅम्पियन्स नेदरलँड्सने भारताचा 2-1 तसेच 3-2 अशा गोलफरकाने पराभव केला. त्यानंतर अर्जेंटिनाने भारताला सलग दोन सामन्यांत पराभूत केले. हॉकी मानांकनात पाचव्या स्थानावर असलेल्या भारताने 12 सामन्यांतून 15 गुण मिळविले आहेत. आणखी महत्त्वाचे गुण मिळविण्यासाठी भारतीय हॉकी संघाला शनिवारच्या सामन्यात बलाढ्या ऑस्ट्रेलियाला पराभुत करण्यासाठी दर्जेदार कामगिरी करण्याशिवाय गत्यंतर नाही. ऑस्ट्रेलियाबरोबरच्या सामन्यात भारताला विजयाची नितांत गरज आहे. युरोपियन टप्प्यातील चौथ्या सामन्यात कर्णधार हरपनप्रित सिंग दुखापतीमुळे खेळू शकला नाही. भारतीय संघासमोर पेनल्टी कॉर्नरची समस्या मात्र अधिकच जाणत आहे. नेदरलँड्स विरुद्धच्या पहिल्या सामन्यात भारतीय संघातील खेळाडूंना पेनल्टी कॉर्नरचा लाभ उठविता न आल्याने त्यांना हार पत्करावी लागली होती. तसेच अर्जेंटिनाबरोबरच्या पहिल्या सामन्यात भारताने 45 मिनिटांपर्यंत आघाडी घेतली होती. पण शेवटच्या 15 मिनिटांच्या कालावधीत अर्जेंटिनाने मिळालेल्या संधीचा फायदा घेत भारतावर 4-3 असा निसटता विजय मिळविला होता. त्यानंतर अर्जेंटिनाबरोबरच्या दुसऱ्या सामन्यात भारताला पुन्हा निसटत्या पराभवाला सामोरे जावे लागले. अर्जेंटिनाने हा दुसरा सामना 2-1 अशा फरकाने जिंकला. या सामन्यात भारताला तीन पेनल्टी कॉर्नर तर अर्जेटिनाला 8 पेनल्टी कॉर्नर्स मिळाले होते. शनिवारच्या सामन्यात निश्चितच भारताच्या तुलनेत ऑस्ट्रेलियाचे पारडे जड वाटते. आता युरोपियन टप्प्यातील स्पर्धेत भारताचे शेवटचे दोन सामने बेल्जियमबरोबर 21 आणि 22 जूनला होणार आहेत.









