इराणवरील हल्ल्याची दिली माहिती, भारताने केले शांततेचे आवाहन, हल्ल्यात इराणची प्रचंड हानी
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी इस्रायलने केलेल्या इराणवरील हल्ल्याची माहिती दिली आहे. यासाठी त्यांनी शुक्रवारी दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दूरध्वनी केला होता. आपल्या संभाषणात नेतान्याहू यांनी त्यांना मध्यपूर्वेतील स्थिती आणि इस्रायलची सुरक्षा यांची पार्श्वभूमीही स्पष्ट केली. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना भारताला वाटणारी चिंता स्पष्ट केली आणि शांतता प्रस्थापित करण्याचे आवाहन केले.
इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याप्रमाणेच अनेक राष्ट्रप्रमुखांना इस्रायलच्या कारवाईसंदर्भात दूरध्वनी केला असल्याची माहिती इस्रायलच्या प्रशासनाने दिली आहे. भारत, जर्मनी आणि फ्रान्स या देशांच्या नेत्यांची त्यांनी चर्चा केली आहे. तसेच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्याशीही संपर्क केला जाणार आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन, ब्रिटनचे नेते कीर स्टार्मर तसेच इतर महत्वाच्या राष्टनेत्यांशीही इस्रायल यासंबंधात संपर्क करणार आहे.
जागतिक सहानुभूती
इराणचा अणुबाँब हा इस्रायलच्या मुळावर उठू शकतो. अण्वस्त्रधारी इराण हा इस्रायलच्या अस्तित्वासाठीच धोका ठरु शकतो. ही महत्वपूर्ण बाब आता जगातील सर्व मोठ्या देशांनी लक्षात घेतलेली आहे. इस्रायलला स्वसंरक्षणाचा अधिकार आहे. आपल्याला असलेले संभाव्य धोके संपविण्याचाही त्या देशाला अधिकार आहे, ही बाब जगातील नेत्यांनी मान्य केल्याचे प्रतिपादन इस्रायलकडून करण्यात आले.
इराणच्या अण्वस्त्रांचा धोका
इराणच्या अण्वस्त्रांचा धोका केवळ इस्रायलला नव्हे, तर अन्य काही इस्लामी राष्ट्रांनाही वाटत आहे. इराणला इस्लामी देशांचे नेतृत्व करण्याची महत्वाकांक्षा असून ती पूर्ण करुन घेण्यासाठी तो देश आपले शस्त्रबळ वाढवत आहे. त्याने अणुबाँब विकसीत केल्यास तो ‘इस्लामी बाँब’ म्हणून ओळखला जाऊ शकतो. इस्लामी राष्ट्रांचे नेतृत्व आपल्या हाती यावे, अशी महत्वाकांक्षा सध्या तीन देशांच्या नेत्यांमध्ये आहे. तुर्कियेचे एर्डोगनही या स्पर्धेत आहेत. शस्त्रबळ वाढविल्याशिवाय ही महत्वाकांक्षा पूर्ण होणे शक्य नाही, याची जाणीव या तीन्ही देशांच्या नेत्यांना आहे. त्यामुळे सौदी अरेबिया, तुर्किये आणि इराण हे तीन्ही देश सध्या शस्त्रबळ वाढविण्याच्या मागे लागलेले आहेत. त्यामुळे शस्त्रास्त्रस्पर्धा वाढीला लागली आहे.
भारताची भूमिका
मध्यपूर्वेत अस्थिरता आल्यास त्याचा परिणाम अनेक देशांवर होऊ शकतो. म्हणून भारताने लवकरात लवकर शांतता प्रस्थापित करण्याचे आवाहन केले आहे. चर्चेच्या माध्यमातूनच खरे तर कोणत्याही समस्येवर तोडगा काढला जाऊ शकतो, ही भारताची भूमिका आहे. ताज्या इस्रायल-इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवरही ही भूमिका भारताने पुन्हा एकदा मांडली असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
पुढे काय होणार…
इस्रालयने इराणच्या अणुकेंद्रांवर हल्ले केले आहेत. त्यामुळे इराण स्वस्थ बसणार नाही, अशी अनेकांची अटकळ आहे. इराणने इस्रायलवर हल्ला केल्यास दोन्ही देशांमध्ये युद्ध भडकू शकते. इराणला अणुबाँब तयार करण्यापासून रोखणे हे अमेरिका आणि इस्रायलचे ध्येय आहे. यासाठी हे दोन देश इराणला राजी करण्याचा प्रयत्न करीत आहेत. अमेरिकेने यासाठी चर्चेचा मार्ग निवडला आहे, तर इस्रायलने इराणवर संघर्षाचा दबाव आणण्याचा प्रयत्न चालविला आहे. बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष होते, तेव्हा त्यांनी इराणशी अणुकरार केला होता. इराणने अणुबाँब बनवू नये, ही अमेरिकेची अट त्याहीवेळी होती. आता काय होणार हे येत्या काही आठवड्यांमध्ये स्पष्ट होईल, असे तज्ञांचे अनुमान आहे.









