चिपळूण :
गुजरातमध्ये गुरुवारी सकाळी एअर इंडियाच्या प्रवासी विमानाला झालेल्या अपघातात या विमानाच्या क्रू मेंबर म्हणून कार्यरत अपर्णा महाडिक (35) यांचा मृत्यू झाला. त्या मुंबईत राहत असल्या तरी मूळच्या चिपळूण तालुक्यातील धामेली गावच्या सूनबाई असल्याने चिपळूण तालुक्यावर शोककळा पसरली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, खासदार सुनील तटकरे यांचे भाचे अमोल महाडिक यांच्या पत्नी होत.
अपर्णा या मूळच्या चिपळूण तालुक्यातील धामेली-भोजनेवाडी येथील रहिवासी होत्या. त्या गेल्या काही वर्षांपासून एअर इंडियामध्ये सेवेत होत्या आणि गुऊवारी नेहमीप्रमाणे ड्युटीवर असताना, तांत्रिक कारणामुळे घडलेल्या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. त्यांचे पती अमोल महाडिक हे एअर इंडिया सेवेत पायलट आहेत. विमान अपघातात अपर्णा यांच्या मृत्यूची बातमी समजताच, त्यांच्या सहकाऱ्यांपासून ते नातेवाइकांपर्यंत साऱ्यांवर शोककळा पसरली आहे. या घटनेने संपूर्ण कोकण परिसर हळहळला आहे. राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय वर्तुळात यावर तीव्र दु:ख व्यक्त होत आहे. अपर्णा यांची विनम्रता, व्यावसायिक कार्यक्षमतेसाठी ओळख होती.
- धामेली गावावर शोककळा
अपर्णा महाडिक यांचे सासरे यशवंत महाडिक यांचे धामेली भोजनेवाडी येथे घर आहे. त्यांचे सुपुत्र अमोल हे एअर इंडियामध्ये पायलट आहेत. तर अपर्णा या क्रू मेंबर्स म्हणून कार्यरत होत्या. अपर्णा या मूळच्या मद्रासमधील आहेत. त्यांचा अमोल महाडिक यांच्याबरोबर त्यांचा प्रेम विवाह झालेला आहे. त्यांना एक बारा वर्षांची मुलगी आहे.
सासू, सासरे, अमोल, अपर्णा आणि मुलगी असे हे पाच जणांचे कुटुंब मुंबईला राहतात. हे कुटुंब दरवर्षी गणपती आणि शिमगोत्सवाला न चुकता येऊन येथील उत्सवात सहभागी होतात. दोन वर्षांपूर्वी गणेशोत्सवात हे कुटुंब आले होते. गेल्या वर्षी अमोल यांना सुट्टी न मिळाल्याने या कुटुंबाला गणपती आणि शिमगोत्सवाला येता आलं नाही, अशी माहिती धामेलीचे सरपंच अनिल भोजने यांनी दिली. अपर्णा यांच्या मृत्यूचे वृत्त धडकल्यानंतर ग्रामस्थांनी मुंबईकडे धाव घेतली.








