सल्ला घेऊनच खरेदी करण्याची सूचना : राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये निकृष्ट दर्जाची खते-बियाणे आढळल्याच्या तक्रारी
बेळगाव : राज्यात मान्सूनची चाहूल लागल्यामुळे शेतकरी आनंदात असतानाच निकृष्ट दर्जाची खते, नकली बियाणे यांचा सुळसुळाट वाढल्याने शेतकऱ्यांसमोर संकट निर्माण झाले आहे. निकृष्ट दर्जाची बी-बियाणांची विक्री, बनावट खते तयार करण्याची केंद्रे तसेच रासायनिक खतांच्या अनधिकृत केंद्रांवर कृषी खात्याच्या भरारी पथकाने काही दिवसांपूर्वी छापेमारी केली होती. मागील दहा महिन्यात तीस ठिकाणी छापेमारी करून 37.83 लाख रुपये किमतीचे बनावट निकृष्ट दर्जाची बियाणे, खते जप्त करण्यात आले होते. यामध्ये 13 क्विंटल बियाणे आहेत.
मागील दोन-तीन आठवड्यात गदग, बागलकोट, हावेरी यासह राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये निकृष्ट दर्जाची खते, बियाणे आढळून आल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी होत्या. यामध्ये अधिकाधिक डीएपी खते, सोयाबिन, पालेभाज्यांची बियाणे यांचा समावेश असल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. महाराष्ट्र, आंध्रप्रदेशातील बहुतांशी बियाणे तयार करणाऱ्या कंपन्या आपल्या संशोधन केंद्रामध्ये बी-बियाणे तयार करून त्यावर आकर्षक लेबल लावून बनावट कापूस, तूर, सूर्यफूल व पालेभाज्यांची बियाणे विक्री करीत असल्याचा आरोप आहे. ही बियाणे कमी दरात मिळत असल्याने सीमाभागातील जिल्ह्यातील शेतकरी खरेदी करून पेरणी केल्याने त्यांना फटका बसला आहे.
शेतकऱ्यांच्या तक्रारी
बागलकोट जिल्ह्यामध्ये 50 किलोची 240 पोती बनावट खते भरलेली लॉरी जप्त करण्यात आली होती. गदग जिल्ह्यामध्ये 50 किलोची 520 पोती बनावट खतांची पोती आढळून आली होती. बेळगाव जिल्ह्यामध्ये तुरकर शिगीहळ्ळी व हिरेबागेवाडीमध्ये पेरण्यात आलेली बियाणे उगवली नसल्याच्या, हावेरीतील करजगी विभागात शेतवडीतून पेरण्यात आलेले सूर्यफुलांचे बियाणे उगवले नसल्याच्या तेथील शेतकऱ्यांच्या तक्रारी होत्या.
परवाने रद्द
2023-24 मध्ये 68 प्रकरणे दाखल होऊन 2.61 कोटी रकमेचा बनावट माल जप्त करण्यात आला होता. त्याप्रमाणे मागील दोन वर्षात राज्यात निकृष्ट बियाणे, कीटकनाशके, खते विक्री करणाऱ्या 53 दुकानांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. त्याशिवाय 34 बियाणे विक्रेत्यांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत.
शेतकऱ्यांना सूचना
बनावट बी-बियाणे, खते, किटकनाशके खरेदी केल्यामुळे शेतकऱ्यांना फटका बसू नये यासाठी काही सूचनाही करण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांनी अधिकृत दुकानातूनच ती खरेदी करून रितसर पावती घ्यावी. प्रत्येक पॅकेटबरोबर मूठभर बियाणे, खते बाजूला काढून ठेवावे. शेतकऱ्यांजवळ रितसर पावती असल्यास संबंधित विक्रेत्यावर कारवाई करणे सुलभ होणार आहे. शेतकऱ्यांनी कृषी संपर्क केंद्रांच्या सल्ल्यानुसार खते, बियाणे, किटकनाशके खरेदी करावीत. अशा सूचना करण्यात आल्या आहेत.
भरारी पथकाने केलेली कारवाई
- वर्ष तक्रारी जप्त माल
- 2022-23 81 6.93 कोटी रु.
- 2023-24 68 2.61 कोटी रु.
- 2024-25 (31 मेपर्यंत) 30 37.83 लाख रु.









