वृत्तसंस्था/अॅमस्टलव्हीन (नेदरलँड्स)
आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या प्रो लीग युरोपियन टप्प्यातील स्पर्धेत भारताच्या पुरुष हॉकी संघाला सलग तिसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले. बुधवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात अर्जेंटिनाने भारताचा 4-3 अशा गोलफरकाने पराभव केला. आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या प्रो लीग युरोपियन टप्प्यातील पहिल्या सामन्यात ऑलिम्पिक विजेत्या नेदरलँड्सने भारताचा 2-1 तर त्यानंतर दुसऱ्या सामन्यात पुन्हा नेदरलँड्सने भारताचा 3-2 असा पराभव केला होता. तिसऱ्या सामन्यात अर्जेंटिनाने दर्जेदार खेळ करुन भारतावर निसटता विजय मिळविला. या सामन्यात अर्जेंटिनातर्फे कर्णधार मॅटियस रे ने तिसऱ्या मिनिटाला, लुकास मार्टिनेझने 17 व्या मिनिटाला, सॅन्टियागो टेराझोनाने 34 व्यामिनिटाला आणि लुसीओ मेंडेझने 46 व्या मिनिटाला गोल नोंदविले. भारतातर्फे कर्णधार हरमनप्रित सिंगने 12 व्या आणि 33 व्या मिनिटाला असे दोन गोल नोंदविले. ते 42 व्या मिनिटाला अभिषेकने भारताचा तिसरा गोल केला.
या सामन्यात भारताने पहिल्या 15 मिनिटांच्या कालावधीत आक्रमक आणि वेगवान खेळावर अधिक भर देत अर्जेंटिनावर दडपण आणण्याचा प्रयत्न केला. पण भारतीय संघातील बचावफळीत खेळणाऱ्या अमित रोहीदासच्या चुकीमुळे कर्णधार मटायस रे ने शानदार गोल नोंदवून अर्जेंर्टिनाचे खाते उघडले. 12 व्या मिनिटाला भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला. या कॉर्नरवर हरमनप्रित सिंगने अचूक गोल नोंदवून भारतालाबरोबरी साधून दिली. भारताला ही आघाडी अधिक वेळ राखता आली नाही. 17 व्या मिनिटाला मार्टिनेझने मैदानी गोल करुन अर्जेटिंनाला आघाडीवर नेले. मध्यंतरापर्यंत अर्जेंटिनाने भारतावर 2-1 अशी आघाडी मिळविली होती. 33 व्या मिनिटाला भारताला पेनल्टी स्ट्रोक मिळाला आणि कर्णधार हरमनप्रित सिंगने गोल नोंदवून अर्जेंटिनाशी बरोबरी केली. 34 व्या मिनिटाला सॅटियागो टेराझोनाने गोल नोंदवून अर्जेंटिनाला आघाडीवर नेले. 39 मिनिटाला भारताला आणखी एक पेनल्टी कॉर्नर मिळाला पण त्याचा लाभ घेता आला नाही. 42 व्या मिनिटाला अभिषेकने भारताचा तिसरा गोल नोंदवून अर्जेटिनाशी बरोबरी केली. 46 व्या मिनिटाला मेंडेझने अर्जेटिनाचा चौथा आणि निर्णायक गोल करुन भारताचे आव्हान संपुष्टात आणले. 55 व्या मिनिटाला भारताला आणखी एक पेनल्टी कॉर्नर मिळाला. पण त्याचा लाभ भारतीय खेळाडूंना घेता आला नाही. आता या दौऱ्यात सदर स्पर्धेतील परतीचा भारताचा सामना अर्जेंटिनाबरोबर येथे गुरुवारी उशीरा होत आहे.









