वृत्तसंस्था/लंडन
जागतिक टेनिस क्षेत्रामध्ये प्रतिष्ठेच्या विम्बल्डन ग्रॅन्डस्लॅम स्पर्धा आयोजकांनी विजेत्यांना देण्यात येणाऱ्या बक्षीस रकमेत विक्रमी वाढ जाहीर केली आहे. स्पर्धा आयोजकांनी 53.5 दशलक्ष पौंड्सची (सुमारे 73 दशलक्ष डॉलर्स) एकूण बक्षीस रक्कम जाहीर केली आहे. 2025 ची विम्बल्डन ग्रॅन्डस्लॅम स्पर्धा 30 जून ते 13 जुलै दरम्यान होणार आहे. सदर स्पर्धा टेनिस क्षेत्रातील सर्वात जुनी असून यावेळी या स्पर्धेत पहिल्यांदाच लाईन जजेसच्या जागी इलेक्ट्रॉनिक लाईन-कॉलिंगने निर्णय घेतले जाणार आहेत. गेल्या वर्षी या स्पर्धेत विजेत्यांसाठी देण्यात आलेल्या एकूण रकमेत यावषीं 3.5 दशलक्ष पौंडची (6.8 दशलक्ष डॉलर्स) वाढ करण्यात आली आहे.
सदर वाढ गेल्या वर्षीच्या तुलनेत 7 टक्क्याने वाढविण्यात आली आहे. सदर स्पर्धा ग्रासकोर्टवर खेळविली जात असून 10 वर्षांपूर्वी या स्पर्धेत विजेत्यांना देण्यात येणाऱ्या बक्षिसाच्या रकमेत यावेळी दुप्पट वाढ झाली आहे. गेल्या दहा वर्षांच्या कालावधीत बक्षीस रकमेच्या वाढीचा आलेख पाहिल्यास यावर्षी 7 टक्के वाढ दिसून येईल, असे अखिल इंग्लंड टेनिस संघटनेच्या अध्यक्षा डेबोरा जेव्हन्स यांनी सांगितले. 2025 च्या विम्बल्डन ग्रॅन्डस्लॅम टेनिस स्पर्धेत एकेरीतील विजेत्यांसाठी प्रत्येकी 3 दशलक्ष पौंड (4 दशलक्ष डॉलर्स) बक्षीस रक्कम अखिल इंग्लंड टेनिस क्लबच्या अधिकाऱ्यांनी देण्याची घोषणा गुरुवारी केली. गेल्या वर्षीच्या तुलनेत 2025 च्या टेनिस हंगामातील या स्पर्धेत पुरुष आणि महिला एकेरीच्या विजेत्यांच्या बक्षिसामध्ये 11.1 टक्के वाढ दर्शविते. ग्रॅन्डस्लॅम नफ्यातील मोठ्या वाट्यासाठी खेळाडूंची वाढती मागणी वाढली होती. एकेरीच्या (पुरुष आणि महिला) पहिल्या फेरीत पराभूत होणाऱ्या टेनिसपटूंना 66 हजार पौंड्स मिळतील.
प्रत्येक वर्षी चार ग्रॅन्डस्लॅम स्पर्धा भरविल्या जातात. या स्पर्धेमध्ये फक्त बक्षीस रकमेवर लक्ष केंद्रित केल्याने टेनिससाठी आव्हान काय आहे, हे कळत नाही, असेही जेव्हन्स यांनी म्हटले आहे. टेनिसमधील आव्हान हे आहे की खेळाडूंना ऑफसिझन हवा असतो पण त्यांना तो मिळत नाही. त्यांच्याकडे वाढत्या दुखापती आहेत ज्याबद्दल ते बोलत आहेत आणि आम्ही नेहमीच म्हटले आहे की, विम्बल्डन म्हणून आम्ही टूर्सशी संवाद साधण्यास आणि उपाय शोधण्यासाठी चर्चा करण्यासाठी तयार असून चर्चेची दारे नेहमीच उघडी राहतील, असेही जेव्हन्स यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.









