पुढील आठवड्यापासून हालचाली वाढणार : 10 राज्यांमध्ये नवीन प्रदेशाध्यक्ष निवडणार
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी भाजपच्या नवीन राष्ट्रीय अध्यक्षांची निवड होऊ शकते. पुढील आठवड्यापासून या दिशेने हालचाली गतिमान होण्याची शक्यता आहे. याचदरम्यान वेगवेगळ्या राज्यांमध्ये नवीन प्रदेशाध्यक्षांची निवड होईल. त्यानंतर लवकरच राष्ट्रीय अध्यक्षांची निवडणूक प्रक्रिया सुरू होण्याची अपेक्षा आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी केलेल्या अनौपचारिक चर्चेतून आता नवीन अध्यक्षांची निवड पुढे ढकलली जाणार नसल्याचे संकेत मिळत आहेत. संसदेचे पावसाळी अधिवेशन 21 जुलैपासून सुरू होत आहे. साहजिकच त्याआधी संघटनेत नवीन राष्ट्रीय अध्यक्ष निवडण्याची प्रक्रिया पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे.
जे. पी. नड्डा यांचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून कार्यकाळ जून 2024 मध्ये संपला आहे. सध्या त्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. ते केंद्र सरकारमध्ये मंत्री देखील असल्यामुळे भाजप लवकरच नवीन अध्यक्ष निवडण्याची तयारी करत आहे. 15 ऑगस्टनंतर बिहार विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू होईल. त्यामुळे, बिहारमधील विधानसभा निवडणुकीनंतर नवीन राष्ट्रीय अध्यक्षांबद्दल कोणताही गोंधळ निर्माण होऊ नये म्हणून भाजप त्याआधी नवीन राष्ट्रीय अध्यक्ष निवडू शकते. आता दहा राज्य प्रदेशाध्यक्षांच्या निवडीबाबत काम वेगाने सुरू आहे. 21 जूनपर्यंत विविध राज्यांमध्ये नवीन अध्यक्षांची निवड झाल्यानंतर राष्ट्रीय अध्यक्षांची निवडणूक प्रक्रिया सुरू होईल, असे पक्षाच्या सूत्रांचे म्हणणे आहे.









