ब्रेन ट्यूमरवर मात करणारा डॉक्टर
वृत्तसंस्था/वॉशिंग्टन
भारतीय वंशाचे श्रीनिवास मुक्कमला यांनी अमेरिकेत इतिहास रचला आहे. श्रीनिवास हे अमेरिकन मेडिकल असोसिएशनचे (एएमए) अध्यक्ष झाले आहेत. संघटनेच्या 178 वर्षांच्या इतिहासात अध्यक्षपद मिळविणारे ते पहिले भारतीय वंशाचे डॉक्टर ठरले आहेत. मुक्कमला यांची नियुक्ती 8 सेंटीमीटरचा ब्रेन ट्युमर हटविण्याच्या शस्त्रक्रियेच्या काही महिन्यांनी झाली आहे. आमच्या आरोग्य सेवा प्रणालीत अनेक मोठ्या त्रुटी आहेत, ज्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. याचमुळे आमच्या रुग्णांसाठी पुरेशा आरोग्यसेवांसाठी लढाई जारी ठेवणे महत्त्वपूर्ण आहे आणि एक स्थायी, न्यायसंगत आरोग्य सेवा प्रारुपासाठी आम्ही लढाई लढत राहू असे उद्गार श्रीनिवास यांनी काढले आहेत.
मुक्कमला यांनी दीर्घकाळापासून एएमएमध्ये काम केले आहे. पेन केयर टास्क फोर्सचे देखील त्यांनी नेतृत्व केले आहे. तसेच ओव्हरडोस संकटावर मात करण्यासाठी पुरावे-आधारित धोरणेही त्यांनी विकसित केली आहेत. मुक्कमला यांनी स्वत:च्या यशाचे श्रेय आईवडिल, भारतीय स्थलांतरित डॉक्टर्स आणि स्वत:चे शहर फ्लिंटला दिले. माझे आईवडिल अप्पाराव आणि सुमती यांच्या पाठिंब्याशिवाय मी येथे पोहोचू शकलो नसतो. माझे आईवडिल भारतात स्वत:च्या मुलांसाठी उपलब्ध नसलेल्या संधींच्या शोधात अमेरिकेत आले होते असे मुक्कमला यांनी म्हटले आहे.
पत्नीही आहे डॉक्टर
मुक्कमला यांनी मिशिगन विद्यापीठातून स्वत:ची वैद्यकीय पदवी आणि शिकागोच्या लोयोला विद्यापीठात पुढील शिक्षण घेतले आहे. त्यांची पत्नी नीता कुलकर्णी देखील एक स्त्राrरोगतज्ञ आहेत, या पती-पत्नींनी फ्लिंट या शहरात वैद्यकीय प्रॅक्टिस केली आहे.









