वृत्तसंस्था / हैदरबाद
डावखुरा फलंदाज तिलक वर्मा इंग्लिश क्लबने संपर्क साधल्यानंतर कौंटी चॅम्पियनशिपमध्ये हॅम्पशायरचे प्रतिनिधीत्व करण्यास सज्ज झाला आहे, असे हैदराबाद क्रिकेट असोसिएशनने (एचसीए) बुधवारी सांगितले.
हैदराबादचा रहिवासी असेला आणि इंडियन प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधीत्व करणारा 22 वर्षीय खेळाडू, भारतासाठी 25 टी-20 आणि चार एकदिवशीय सामन्यांमध्ये खेळला आहे. त्यात त्याने अनुक्रमे 749 आणि 68 धावा केल्या आहेत. हैदरबाद क्रिकेट असोसिएशनला हे कळवण्यास आनंद होत आहे की, हैदराबाद आंतरराष्ट्रीय खेळाडू एन. ठाकुर तिलक वर्मा यांना हॅम्पशायर कौंटी संघाने युके कौंटी चॅम्पियनशिप लीगमध्ये खेळण्यासाठी संपर्क साधला आहे, असे एचसीएने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. हैदराबाद क्रिकेट असोसिएशन त्याला हॅम्पशायर कौंटीसोबत उत्तम कामगिरीसाठी शुभेच्छा देतो. वर्मा यांनी 18 प्रथम श्रेणी सामने देखील खेळले आहेत. ज्यामध्ये 50.16 सरासरीने 121 सर्वोच्च धावसंख्येसह 1204 धावा केल्या. त्यात पाच शतके आणि चार अर्धशतके आहेत.









