तपास यंत्रणांनी केले भक्कम पुरावे संकलित : अजूनही सखोल तपास करणार
वृत्तसंस्था / शिलाँग
पती राजा रघुवंशी याची हत्या केल्याची कबुली सोनम रघुवंशी हिने दिली आहे. देशभर गाजत असलेल्या या ‘मधुचंद्र हत्या’ प्रकरणात आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली असून पुढचा तपास केला जात आहे. या प्रकरणी भक्कम पुरावे संकलित करण्यात आले असून ते सोनम हिला दाखविल्यानंतर तिच्यासमोर गुन्हा कबूल केल्याशिवाय पर्याय राहिला नव्हता, अशी माहिती देण्यात आली.
2 जूनला मेघालयच्या एका दरीत राजा रघुवंशी या इंदूरच्या युवकाचा मृतदेह आढळला होता. प्रथम अपघात वाटणारे हे प्रकरण नंतर हत्येपर्यंत पोहचले आहे. राजा रघुवंशी याची नवपरिणित पत्नी सोनम हिने लग्नापूर्वीच पतीच्या हत्येचा कट रचला होता. तिचा प्रियकर मानला जाणारा राज कुशवाहा आणि त्याच्या चार मारेकरी मित्रांनी राजा रघुवंशी याची हत्या, हे जोडपे मधुचंद्रासाठी मेघालयमध्ये गेले असताना केली होती. सोनम हिला उत्तर प्रदेशच्या गाझीपूर या शहरातून अटक करण्यात आली होती. पोलिस आणखी सखोल तपास करीत आहेत.
विवाह मान्य नव्हता…
सोनम हिचा विवाह राजा रघुवंशी याच्याशी सोनमच्या आईवडिलांनी ठरविला होता. तथापि, तिला तो मान्य नव्हता. माझ्या इच्छेविरुद्ध विवाह कराल तर पतीची मी दुर्दशा करुन टाकीन, अशी धमकी सोनम हिने तिच्या आईवडिलांना दिली होती, असे तपासात स्पष्ट झाले आहे. मात्र, ती अशा प्रकारे धमकी खरी करेल, याची कल्पना तिच्या आईवडिलांना त्यावेळी आली नव्हती, असे समजते.
आणखी एक व्यक्तीचा हात…
सध्या या हत्या प्रकरणाची मुख्य सूत्रधार म्हणून सोनम हिच्याकडेच पाहिले जात आहे. मात्र, सोनमचे आणि मुख्य आरोपी राज कुशवाहा यांचे प्रेमसंबंध नव्हते, असा दावा तिच्या भावाने केला आहे. ती राज कुशवाहा याला राखी बांधत होती, असेही त्याचे म्हणणे आहे. त्यामुळे या प्रकरणात आणखी कोणाचा हात आहे काय, याचाही शोध घेतला जात आहे. त्यामुळे सोनम हिने गुन्हा कबूल केला असूनही अद्याप प्रकरणाचा तपास थांबलेला नाही, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. पोलिसांना पाचही आरोपींची कोठडी मिळाल्याचे स्पष्ट केले गेले आहे.
काळ्या जादूचा आरोप
राजा रघुवंशी याच्या आईने सोनम हिच्यावर ती काळी जादू करीत असल्याचा आरोप केला आहे. तसेच तिची वर्तणूक प्रथमपासूनच चांगली नव्हती, असेही त्यांचे म्हणणे आहे. तथापि, विवाहानंतर सर्व काही सुरळीत होईल अशा भावनेने विवाह करुन देण्यात आला होता, सोनम रघुवंशी हिच्या पित्याचे म्हणणे आहे.









