बीएलएसोबत भीषण संघर्ष : 9 बलूच सदस्यांनी गमाविला जीव
वृत्तसंस्था/ क्वेटा
पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात पाकिस्तानी सैन्य आणि बलुच संघटनांदरम्यान भीषण संघर्ष झाला आहे. वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या संघर्षात पाकिस्तानचे 23 सैनिक मारले गेले आहेत. बलूच लिबरेशन आर्मीचे 9 सदस्य या संघर्षात मृत्युमुखी पडले आहेत. यातील एक चकमक गोनी पारा येथे झाली असून तेथे पाकिस्तानी सैन्याच्या मदतीसाठी हेलिकॉप्टर्सद्वारे कमांडोंना उतरावे लागले होते.
मस्तंगच्या भागात पाकिस्तानी सैन्य आणि बीएलएच्या सदस्यांदरम्यान संघर्ष झाला. या संघर्षात पाकिस्तानचे 8 सैनिक मारले गेले तर अनेक जखमी झाले. याचबरोबर अन्य एका चकमकीत पाकिस्तानचे अनेक सैनिक ठार झाले आहेत.
बलुचिस्तानात बलूच सशस्त्र समूह आणि पाकिस्तानी सैन्यामधील संघर्ष आता तीव्र झाला आहे. पाकिस्तानी सैन्याने मोठ्या संख्येत तेथे सैनिक तैनात केले आहेत. तरीही बलूच संघटना पाकिस्तानी सैन्यापेक्षा वरचढ ठरत आहेत. काही दिवसांपूर्वी बलूच संघटनांनी प्रांतातील अनेक शहरांवर कब्जा केला होता. यामुळे बिथरलेल्या पाकिस्तानी सैन्याने प्रांतात नागरिकांच्या विरोधात क्रूर अभियान सुरू केले आहे. बलुचिस्तानात पुन्हा एकदा नागरिक गायब होण्याच्या घटना वाढल्या आहेत.
बलुचिस्तानच्या दोन वेगवेगळ्या भागांमधून 9 जणांना पाकिस्तानी सैन्याने ताब्यात घेतले आहे. पाकिस्तानी सैन्याने केचच्या दश्त बालनिगोर जिल्ह्यात 7 युवकांचे अपहरण केले आहे. या घटनांमुळे प्रांतात लोकांचा संताप अनावर झाला आहे.









