राहुल गांधींवरील वक्तव्याप्रकरणी कारवाई
वृत्तसंस्था/ भोपाळ
काँग्रेसने वरिष्ठ नेते दिग्विजय सिंह यांचे बंधू आणि मध्यप्रदेशातील माजी आमदार लक्ष्मण सिंह यांच्या विरोधात मोठी कारवाई केली आहे. लक्ष्मण सिंह यांना पक्षविरोधी कारवायांप्रकरणी 6 वर्षांसाठी पक्षातून हाकलण्यात आले आहे. यापूर्वी पक्षाने लक्ष्मण सिंह यांना कारणे दाखवा नोटीस जारी केली होती. राहुल गांधी समवेत पक्षाच्या अन्य नेत्यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. राहुल गांधी समवेत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना लक्ष्य करत लक्ष्मण सिंह यांनी केलेल्या अपमानास्पद टिप्पणीने सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या असे पक्षाने म्हटले आहे.
टिप्पणीमुळे पक्षाची प्रतिमा आणि प्रतिष्ठेला धक्का पोहोचल्याचे काँग्रेसने लक्ष्मण सिंह यांना बजावलेल्या नोटीसमध्ये नमूद केले होते. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर लक्ष्मण सिंह यांनी 25 एप्रिल रोजी काँग्रेस नेतृत्वाला लक्ष्य केले होते. राहुल गांधी आणि रॉबर्ट वड्रा हे अत्यंत बालिश आहेत. देश त्यांच्या अपरिपक्ततेचे परिणाम भोगत असल्याचे लक्ष्मण सिंह याहंनी एका जाहीर सभेत म्हटले होते.
पक्षाच्या शिस्तपालन समितीचे सदस्य तारिक अन्वर यांनी लक्ष्मण सिंह यांना 9 मे रोजी नोटीस जारी केली होती. यानंतर काँग्रेसने मोठी कारवाई करत लक्ष्मण सिंह यांना 6 वर्षांसाठी पक्षातून हाकलले आहे.
एकेकाळी भाजपमध्ये होते सक्रीय
माजी लोकसभा खासदार तसेच माजी आमदार लक्ष्मण सिंह हे एकेकाळी भाजपमध्ये होते. रस्त्यावर सामूहिक प्रार्थना करण्याची अनुमती न दिल्याने दहशतवाद्यांनी हा हल्ला केल्याचे वक्तव्य रॉबर्ट वड्रा यांनी केले होते. रॉबर्ट वड्रा यांचे हे वक्तव्य देशाच्या सुरक्षेसाठी धोका निर्माण करणारे असल्याची टीका लक्ष्मण् सिंह यांनी केली होती.









