साडेसतरा हजार रुपयांसह दोन मोबाईल जप्त
बेळगाव : यमनापूर (ता. बेळगाव) येथील पाण्याच्या टाकीजवळ मटका घेणाऱ्या दोघा जणांना अटक करून त्यांच्याजवळून 17 हजार 590 रुपये रोख रक्कम व 30 हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल संच जप्त करण्यात आले आहेत. माळमारुती पोलिसांनी ही कारवाई केली आहे. पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची, उपनिरीक्षक होन्नाप्पा तळवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी सोमवार दि. 9 जून रोजी सायंकाळी 6.10 वाजण्याच्या सुमारास ही कारवाई केली आहे. त्यांच्यावर माळमारुती पोलीस स्थानकात कर्नाटक पोलीस कायद्यांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. बसवराज शिवलिंग परके (वय 29) राहणार होनगा, कन्नाप्पा सिद्धाप्पा हालभावी (वय 36) राहणार मुत्यानट्टी अशी त्यांची नावे आहेत. या दोघा जणांनी चिठ्ठ्या शहापूर येथील रवींद्र काटोळकर याला पोहोचवित असल्याची कबुली दिली आहे. त्यामुळे एकूण तिघा जणांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याजवळून 17 हजार 590 रुपये रोख रक्कम, मटक्याच्या चिठ्ठ्या, बॉलपेन, दोन मोबाईल संच जप्त करण्यात आले आहेत.









