वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
राजधानी दिल्लीतील दिलशाद गार्डन येथील कोडी कॉलनीत रविवारी मध्यरात्री उशिरा आग लागली. ई-रिक्षा चार्ज होत असतानाच आगीचा भडका उडाल्याने दोघांचा होरपळून मृत्यू झाला. मृतांमध्ये 24 वर्षीय तरुण आणि एका साठ वर्षीय वृद्धाचा समावेश आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविले. आगीत दोन ई-रिक्षा आणि एक दुचाकी भस्मसात झाली आहे. ई-रिक्षा अति चार्ज झाल्यामुळे आग लागल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले आहे. या संपूर्ण प्रकरणाची अधिक चौकशी सुरू आहे.









