नवी दिल्ली :
आघाडीवरच्या 9 कंपन्यांचे बाजार भांडवल मूल्य मागच्या आठवड्यात 1 लाख 850 कोटी रुपयांनी वाढलेले पाहायला मिळाले. मागच्या आठवड्यामध्ये मुंबई शेअरबाजाराचा बीएसई सेन्सेक्स निर्देशांक 737 अंकांनी वाढला होता. रिलायन्स इंडस्ट्रीज आणि एचडीएफसी बँक या कंपन्यांचे बाजार भांडवल मूल्य सर्वाधिक वाढलेले पाहायला मिळाले. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या कंपनीचे भांडवल मूल्य सर्वाधिक घसरणीत राहिले होते. रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बँक, भारती एअरटेल, आयसीआयसीआय बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, इन्फोसिस, लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, बजाज फायनान्स आणि हिंदुस्थान युनिलिव्हर यांचे बाजार भांडवल मूल्य वाढलेले होते.
रिलायन्स आघाडीवर
रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजार भांडवलमूल्य 30786 कोटी रुपयांनी वाढत 19 लाख 53 हजार 480 कोटी रुपयांवर पोहोचले तर एचडीएफसी बँकेचे 26668 कोटी रुपयांनी वाढत 15,15,853 कोटी रुपयांवर आणि आयसीआयसीआय बँकेचे बाजार मूल्य 9790 कोटींनी वाढत 10 लाख 41 हजार 53 कोटी रुपयांवर पोहोचले. यासोबतच हिंदुस्थान युनिलिव्हरचे बाजार भांडवल मूल्यसुद्धा 9280 कोटी रुपयांनी वाढत 5 लाख 61 हजार 282 कोटी रुपयांवर पोहोचले. दूरसंचार क्षेत्रातील कंपनी भारती एअरटेलचे बाजार भांडवल मूल्य 7127 कोटी रुपयांनी वाढत 10 लाख 65 हजार 894 कोटी रुपयांवर पोहोचले. एलआयसीचे बाजार मूल्य 3953 कोटी रुपयांनी वाढत 6,07,073 कोटी रुपयांवर स्थिरावले होते.









