अर्थ-कर स्थायी समिती बैठकीत निर्णय : कॉम्प्युटर ऑपरेटर्सना आणखी दोन महिने मुदतवाढ
बेळगाव : टिळकवाडी क्लबचा कब्जा घेण्याचा निर्णय यापूर्वीच सर्वसाधारण बैठकीत झाला असताना व क्लबचा कब्जा घेण्याचा आदेश महापालिका आयुक्त शुभा बी. यांनी बजावला असतानादेखील सदर विषय पुन्हा शुक्रवारच्या अर्थ स्थायी समिती बैठकीत चर्चेला घेण्यात आला. त्यामुळे स्थायी समिती अध्यक्ष व सदस्यांनी सदर विषयावर या बैठकीत चर्चा न करता पुन्हा सर्वसाधारण बैठकीतच चर्चा करू, असे अधिकाऱ्यांना सांगितले. त्यामुळे सर्वसाधारण बैठकीत टिळकवाडी क्लबच्या कब्जा व थकीत भाड्याबाबत चर्चा होणार आहे. शुक्रवारी महापालिकेतील स्थायी समिती सभागृहात अर्थ स्थायी समितीची बैठक पार पडली. यावेळी बैठकीच्या अध्यक्षस्थानी अध्यक्षा नेत्रावती भागवत होत्या. सुरुवातीला कौन्सिल सेक्रेटरींनी उपस्थितांचे स्वागत करत मागील बैठकीचे इतिवृत्त वाचून दाखविण्यासह मंजुरी देण्याची विनंती केली. यावेळी सत्ताधारी गटनेते अॅड. हनुमंत कोंगाली, सदस्य नितीन जाधव, महसूल उपायुक्त रेश्मा तालिकोटी, प्रशासन उपायुक्त उदयकुमार तळवार, झोनल आयुक्त अनिल बोरगावी यांच्यासह इतर सदस्य व अधिकारी उपस्थित होते.
गेल्या काही महिन्यांपासून महानगरपालिकेत टिळकवाडी क्लबच्या कब्जावरून जोरदार घमासान सुरू आहे. क्लबने महापालिकेचे भाडे थकविण्यासह घालून दिलेल्या नियम व अटींचे उल्लंघन केले आहे. क्लबचा कब्जा घेण्यात यावा, अशी मागणी सत्ताधारी गटाच्यावतीने यापूर्वी झालेल्या सर्वसाधारण बैठकीत लावून धरण्यात आली होती. त्यामुळे महापौर मंगेश पवार यांनी क्लबचा कब्जा घेण्याची सूचना मनपा आयुक्तांना बैठकीत केली होती. तसेच क्लबची सुनावणी महापालिका आयुक्तांच्या न्यायालयात सुरू होती. आयुक्तांच्या न्यायालयानेदेखील क्लबचा कब्जा घेण्याची सूचना केली आहे. मात्र क्लबचा कब्जा घेण्याऐवजी पुन्हा हा विषय चर्चेसाठी शुक्रवारच्या अर्थ व कर स्थायी समिती बैठकीत घेण्यात आल्याने त्याला अध्यक्ष व सदस्यांनी आक्षेप घेतला. सर्वसाधारण बैठकीत झालेल्या निर्णयावर अंमलबजावणी करण्याऐवजी पुन्हा हा विषय का चर्चेला घेण्यात आला आहे, अशी विचारणा करण्यात आली. त्यावर कायदा सल्लागारांनी कब्जा घेण्यासाठी आणखी दोन महिने लागणार असल्याचे सांगितले.
त्यावर ही बाब तुम्ही सर्वसाधारण बैठकीत का सांगितली नाही, अशी विचारणा कायदा अधिकाऱ्यांना बैठकीत करण्यात आली. त्यावर कब्जा घेण्यासंदर्भात कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याचे कायदा अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. क्लबचा विषय याठिकाणी चर्चेला न घेता पुढील सर्वसाधारण बैठकीतच यावर चर्चा करू, असे सदस्यांनी सांगितले. ई-आस्थी प्रणाली अंतर्गत शहरातील मिळकतींची नोंद करण्यासाठी कंत्राटी पद्धतीवर 25 कॉम्प्युटर ऑपरेटर घेण्यात आले आहेत. ई-आस्थीचे काम अद्याप सुरू असल्याने आणखी दोन महिने ऑपरेटर्सना मुदतवाढ देण्यात यावी, अशी विनंती अधिकाऱ्यांनी केल्यानंतर त्याला होकार दर्शविण्यात आला. त्याचबरोबर जाहिरात फलकासंदर्भातील कर आकारणीवर चर्चा करण्यात आली. केवळ जाहिरात फलकावरच कर न आकारता इतर सर्व प्रकारच्या जाहिरातींवरही कर आकारण्यासंदर्भात नियमावली तयार करण्यात यावी, असे अधिकाऱ्यांना सांगण्यात आले.









