चिपळूण :
सासऱ्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सुनेसह आठ जणांवर बुधवारी चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. हा प्रकार 1 फेब्रुवारी 2020 ते 4 फेब्रुवारी 2022 या कालावधीत शहरातील मार्कंडी येथे घडला. या गुह्यामध्ये सुनेसह पाच महिला व तीन पुरुषांचा समावेश आहे. या संदर्भात सासूने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
अमरनाथ वामनराव कोवळे (वय 59) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणात पाच महिलांसह मंदार सुरेंद्र पोटफोडे, प्रसाद प्रमोद करडे, प्रशांत प्रमोद करडे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीची सून अमरनाथ कोवळे यांचा अपमान करीत असे. त्याबद्दल तिला समज देऊनही फरक पडत नव्हता. उलट मुलालाही मानसिक त्रास देऊन स्वत:च्या जिवाचे नुकसान करुन घेऊन तुमच्यावर त्याचे खापर फोडू, अशी धमकी देऊन दबाव निर्माण केला होता. तिला समजवण्याबाबत गुन्हा दाखल झालेल्या तिच्या माहेरच्या अन्य सात जणांना सांगितले असता त्यांनीही फिर्यादी व त्यांच्या कुटुंबीयांना उलट-सुलट उत्तरे दिली होती. यामुळे मानसिक छळ, अपमानास्पद वागणूक व खोट्या गुह्यात अडकवण्याच्या धमकीला कंटाळून अमरनाथ कोवळे यांनी आत्महत्या केली. या प्रकरणी आठ जणांवर चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.








